चीनला प्रतिबंध – कायमस्वरूपी उपाययोजना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनच्या विद्यमान सरकारला देशांतर्गत विरोध प्रचंड वाढत आहे. सक्तीचे लॉकडाऊन हे यामागील मुख्य कारण आहे. असे असूनही हिंदुस्थानच्या कुरापती काढण्याची त्यांची जुनी खोड कायम आहे. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असे म्हणतात तसेच चीनचे आहे. यातील लक्षवेधी सूत्र म्हणजे चीनच्या बऱ्याच प्रांतांत कोरोनाचा उद्रेक चालू आहे. त्याला अटकाव करण्यासाठी तिथे ‘झीरो कोविड पॉलिसी’ राबवताना लोकांवर सरकारकडून अमानुषपणे अत्याचार केले जात आहेत. अर्थात चिनी सैनिक जे नियंत्रण सीमेवर हिंदुस्थानी सैनिकांशी झटापटी करत आहेत तेही त्यांच्या देशातील कुठल्या तरी भागांतून आलेले असणार आहेत. ज्या देशात आजही कोविडचा मोठय़ा प्रमाणावर संसर्ग आहे, त्या देशाचे सैनिक हिंदुस्थानी सैनिकांसह झटापटी करून त्या भागातील हिंदुस्थानी सैनिकांत कोविडचा फैलाव करू इच्छित नसतील हे कशावरून? कारण तो चीन आहे. याविषयी हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवला पाहिजे आणि चीनची मस्ती उतरवली पाहिजे. बाह्यतः दिसताना चीनची घुसखोरी दिसते, पण ज्यांनी जगाला कोविडमुळे वेठीस धरले त्यांचे हिंदुस्थानविरुद्धचे मत कधीच चांगले असू शकत नाही. हिंदुस्थानात सर्व सुरळीत चाललेले पाहून पोटशूळ उठणार नाही मग तो चीन कुठला? हिंदुस्थानात कोविड पूर्णतः नियंत्रणात आहे. त्यामुळे सर्व काही आलबेल आहे. जागतिक अर्थव्यवस्था गटांगळय़ा खात असताना हिंदुस्थानची अर्थव्यवस्था मात्र स्थिर आहे. उलटपक्षी त्यात आणखी वाढच होणार आहे. हे जागतिक स्तरावरील अर्थतज्ञ सांगत आहेत. चीनच्या हे नक्कीच डोळय़ात खुपत असणार आहे. त्यामुळे नियंत्रण रेषेवर कुरापती काढण्याचे हुकमी अस्त्र्ा चीन चालवत आहे.

दुसरे सूत्र असे की, अरुणाचल प्रदेशपासून लडाखपर्यंतच्या सीमावर्ती भागांत चीनने पुष्कळ मोठय़ा प्रमाणात सुविधा निर्माण केल्या आहेत. हिंदुस्थानही त्यात मागे नाही, पण तुलनेत हिंदुस्थान त्यांच्या इतका वेग गाठण्यात मागे राहिला हे मान्य करावे लागेल. म्हणजे चीनच्या आधी सुविधा निर्माण करण्यात. एका बाजूला वेगाने पायाभूत सुविधा चीनने निर्माण केल्या आणि त्याच वेळी हिंदुस्थानच्या कुरापती काढणेसुद्धा चालू ठेवले. दुसऱ्याचे हिसकावून घेत ते आपल्या नावे करणे आणि त्याला तिथून हाकलून देणे ही हिंदुस्थानी सभ्यता, संस्कृती नाही. त्यामुळे हिंदुस्थानी सैनिक चुकूनही आपल्या कुरापती काढण्यासाठी येणार नाहीत याची चीनला खात्री आहे. तसेच हिंदुस्थान आपल्याशी उघड युद्ध करणार नाही. त्यामुळे त्याची ताकद अनुभवण्यासाठीही त्याला अधूनमधून डिवचून पाहिले जाते, पण प्रत्येक वेळी त्यांना चोख उत्तर मिळाल्याने त्यांची डाळ शिजत नाही. काँग्रेस पक्षाचे महासचिव जयराम रमेश यांनी केलेल्या आरोपानुसार ‘उत्तर लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनने डेपसांगमध्ये एलएसीच्या सीमेपासून 15 ते 18 किलोमीटर आतपर्यंत 200 ठिकाणी तळ ठोकला आहे, मात्र सरकार यावर गप्प आहे. आता हे प्रकरण अधिक चिंताजनक झाले आहे.’ यातील तथ्य पडताळून पाहिले पाहिजे. राजकीय आरोप-प्रत्यारोप चालूच असतात. त्याशिवाय राजकारण नाही. शाब्दिक चकमकी झोडणे, ट्विटरवर टिवटिव करणे यापलीकडे राजकीय मंडळी जात नाहीत. प्रत्यक्ष नियंत्रण सीमेवर सैनिकांनाच शत्रूशी संघर्ष करावा लागतो. हे माहीत असूनही आवश्यक तेवढेच बोलणे हिंदुस्थानी राजकारणाला मान्य नाही. दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ म्हणजे चीनसारख्या धूर्त देशाचा, असे होत नाही ना? याकडे कोणाचे लक्ष आहे असे वाटत नाही. आपले सैन्य हिंदुस्थानी सैनिकांवर चाल करून गेल्यास देशातील राजकीय वातावरण गरम होईल आणि त्यामुळे राजकीय वादविवाद चालू होतील. परिणामी चीनविरुद्ध देशातून उठाव झाला तरी आजमितीस अचानकपणे चिनी मालावर 100 टक्के बहिष्कार टाकणे शक्य नाही. कारण त्यानंतर तोंड द्याव्या लागणाऱ्या भीषण व्यावसायिक अडचणींना सामोरे जाण्याची हिंदुस्थानची सिद्धता नाही, तसेच आपल्या मालावर बहिष्कार हे सूत्र तात्पुरते असते. काही दिवसांनी हिंदुस्थानी लोक पुन्हा चिनी मालाकडे वळतात. कारण त्याची सवय अंगवळणी पडली आहे, हे चीन उत्तम प्रकारे जाणून आहे. चीनच्या आर्थिक नाडय़ा आवळताना हिंदुस्थानचे हात दगडाखाली आहेत हे हिंदुस्थानही जाणून आहे. चीनला व्यावसायिक स्तरावर धडा शिकवण्यासाठी हिंदुस्थानला त्याच तोडीची किंबहुना त्याहीपेक्षा सर्वोत्तम अशी व्यवस्था करावी लागणार आहे. या सर्व गोष्टी तातडीने अशक्य नाही, इतके आपण चीनवर अवलंबून आहोत. उदा. विशेषतः इलेक्ट्रॉनिक्सचे सुटे भाग, सेमीकंडक्टर, टेलिकॉम क्षेत्रासाठी लागणारी सामुग्री.

हिंदुस्थानच्या कुरापती काढल्या तरी तेथील राजकारणी, जनता अल्पावधीसाठी चिडतील आणि शांत होतील, चीनला याची व्यवस्थित कल्पना आलेली आहे. चीनला नामोहरण करण्यासाठी काय करावे लागेल? यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनाच हवी. कारण चीनच्या कुरापती वाढत आहेत. हिंदुस्थानच्या क्षेपणास्त्र्ा चाचणीच्या वेळी ट्रकिंग जहाज पाठवून, तर कधी तामीळनाडू येथील अणुभट्टी प्रकल्पांची माहिती मिळवण्यासाठी पाणबुडी पाठवून हिंदुस्थानच्या संरक्षणविषयक सूत्रांची माहिती गोळा करण्याचा आटापिटा चालू आहे. अशा चीनला चाप लावण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना हवी.

>> जयेश राणे