पाकिस्तानात महागाईचा भडका; 650 रुपये चिकन तर 10 हजार रुपयांना घरगुती सिलेंडर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीलंकेत महागाईचा उद्रेक झाल्यानंतर आता पाकिस्तानातही महागाईचा आगडोंब उसळला आहे. मूलभूत सुविधा लोकांना मिळेनाशा झाल्या आहेत. चिकन 650 रुपये किलो झाले असून घरगुती सिलेंडर 10 हजारा रुपयांना मिळत आहे. तर गव्हाच्या तुटवड्यामुळे जेवणाच्या ताटातून चपाती दिसेनाशी होईल याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

श्रीलंकेप्रमाणेच पाकिस्तानलाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. देशाच्या सरकारनेही आता ही गोष्ट मान्य केली आहे. देश आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याचे खुद्द पाकच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. पेट्रोल-डिझेल, खाद्यपदार्थ असो की स्वयंपाकाचा गॅस आणि वीज… सर्व काही स्थानिकांच्या आवाक्याबाहेर आहे. देशातील महागाईची स्थिती अशी आहे की डिसेंबर 2022 मध्ये महागाईचा दर 24.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय पाकिस्तानवरील कर्जही सातत्याने वाढत आहे.

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, डिसेंबरमध्ये पाकिस्तानचा ग्राहक मुल्य निर्देशांक (CPI) 24.5 टक्क्यांवर पोहोचला. जर आपण पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (पीबीएस) च्या आकडेवारीवर पाहिले तर, वर्षभरापूर्वी याच कालावधीत हा आकडा 12.28 टक्के होता. ग्राहक मुल्य निर्देशांकांमध्ये वर्षानुवर्षे वाढ होताना दिसत आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने केलेल्या सर्व उपाययोजना अपयशी ठरल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी देखिल देशाची परिस्थिती लक्षात घेता 23 ते 25 टक्क्यामध्ये ही परिस्थिती असल्याचे व्यक्त केला होता. आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की पाकिस्तानमध्ये अन्नधान्य महागाई दर वर्षी 35.5 टक्क्यांनी वाढली आहे, तर वाहतुक प्रवास 41.2 टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि कपडे आणि चपलांच्या किंमती 17.1 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था श्रीलंकेप्रमाणेच झाली आहे. इथे महागाईचा उद्रेक झाला आहे. चिकन आणि एलपीजीच्या किंमतीने लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. इथे चिकन आणि मांस खाणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये चिकन 650 रुपये प्रति किलो विकले जात आहे. हीच परिस्थिती राहिली तर येत्या काही दिवसात ते 800 रुपये प्रती किलो होऊ शकते. एलपीजी गॅसबाबत बोलायचे तर इथे व्यावसायिक गॅस सिलेंडर 10000 पाकिस्तानी रुपयांमध्ये मिळत आहे. वाढत्या किमतींमुळे चिंतेत असलेल्या लोकांना स्वयपांकाचा गॅस प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये घेऊन जाण्याची वेळ आली आहे. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

पाकिस्तानात गॅस, चिकनव्यतिरिक्त पीठ, साखर आणि तूपाच्या किंमतींमध्येही 25 ते 62 टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळत आहे. डॉनच्या वृत्तानुसार, इथे गहू मिळणे चिंतेचा विषय बनले आहे. देशाच्या अनेक भागात गव्हाचे संकट आहे. स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर अशीच परिस्थिती राहिल्यास येत्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानी लोकांच्या ताटातून चपाती दिसेनाशी होऊ शकते. इस्लामाबादमध्ये गव्हाचा रोजचा वापर प्रत्येकी 20 किलोच्या 38,000 पोती आहे. मात्र येथे सुरू असलेल्या 40 पिठाच्या गिरण्यांमधून 21 हजार पिशव्यांचा पुरवठा केला जात आहे.