
>> महेंद्र पाटील
मी मनातल्या एका कप्प्यात अजूनही तुझ्या आठवणी जपून ठेवल्या आहेत. परवा मी सहज तो कप्पा उघडला आणि त्यातून असंख्य आठवणी बाहेर आल्या. त्या मला खूप मागे घेऊन गेल्या… जेव्हा मी एका निवांत संध्याकाळी तुझी वाट पाहत बसायचो. तू त्या रस्त्यावरून यायचीस चालत माझ्यापर्यंत आणि माझ्या नजरेच्या रेषेत आलीस की, तुझे डोळे चोरून मला ओळखीची नजर द्यायचे. आपली ओळख झाली नव्हती तरी तू पुढे निघून जायचीस. खूप काही मागे सोडून जायचीस. तुझ्या गजऱयातल्या फुलांचा मंद दरवळ, पाखरांचा किलबिलाट, मावळतीला जाणारी सांज, मंद वाहणारा वारा आणि हा विशाल आसमंत. मी रात्र झाली की, माझी घरची वाट धरायचो आणि तुझ्या मनात नेमपं माझ्याबद्दल काय चालत असेल हा विचार करत राहायचो रात्रभर. खरं तर तेव्हाच रात्रीची आणि माझी मैत्री झाली पहिल्यांदा…
कधी कधी तुझ्या मनात चोर पावलांनी शिरून तुझा मनातला आवाज ऐकावासा वाटायचा मला. यात पहाट कधी व्हायची हे कळायचंच नाही. मग काय, पुन्हा संध्याकाळची वाट पाहत बसायचो. एकदा अशीच संध्याकाळ झाली होती. मी नेहमीप्रमाणे तुझ्या येण्या-जाण्याच्या वाटेवर उभा होतो, तुझी वाट पाहत. तू येऊ लागली होतीस आता समोरून, तू पुन्हा निघून जाशील पुढे असं वाटत असतानाच तू थांबलीस अचानक. मला क्षणभर वाटलं, पायात काटा रुतला असेल म्हणून थांबली असशील, पण तू खरंच थांबली होतीस आणि तीही माझ्यासाठी. तुझ्या डोळय़ात तेव्हा सांज उतरली होती. माझं ते वाटेवर रोज उभं राहणं, तुझं रोज मला पाहून पुढे निघून जाणं, सारं मनात असूनही ओठावर न येणं या सगळय़ा गोष्टींना आता माझ्यापेक्षा वाटेवरची झाडं, पानं, फुलं, वाट, वळण, सांज, पाखरं, आसमंत सगळेच खूप वैतागले होते. म्हणून वाटेनेच तुझी वाट अडवली असावी. वाराही उलट दिशेने वाहू लागला होता. पाखरांनी किलबिलाट कमी केला होता. पानं, फुलं, झाडं, वेली…सारे आज टक लावून बसले होते. संध्याकाळही तिची वेळ झाली असूनही जायचं नाव घेत नव्हती. तिलाही पाहायचा होता तुझ्या माझ्या पहिल्यावहिल्या भेटीचा क्षण. कायमचा मनात जपून ठेवायला हे सगळे माझे निसर्गमित्र पुढे सरसावले होते. तेव्हा हे सगळं सुरू असताना तो येणार नाही, तर मग नवलच होतं. असा विचार मनात येतो न येतो तोच तो आला… असंख्य ढगांचे ताफे घेऊन… तू लाजत अलगद एक पाऊल पुढे टाकलंस माझ्या दिशेने तेव्हा सगळय़ा कळय़ा लाजून चूर झाल्या. तू क्षणभरच माझ्या डोळय़ात डोळे घालून पाहिलंस आणि हातात हात दिलास आणि इतक्यात तो जोरदार बरसू लागला वेडय़ासारखा. जणू आपल्या भेटीच्या स्वागताला आला होता तो. मनातही प्रेमाचा पाऊस ओथंबून वाहत होता. तू माझी झाली होतीस. हा नुसता एक क्षण साजरा करायला माझे मित्र आतुर झाले होते. बहुतेक आज तू माझी व्हायलाच हवी होतीस खरं तर. कारण आज या वाटेवर येताना मी ठरवलं होतं मनात, आज तू थांबली नाहीस तर पुन्हा या वाटेवर यायचं नाही. पुन्हा त्या वळणावरही पाहायचं नाही, जिथून तू दिसायचीस मला जाता-येता. या वाटेचा, या पाना-फुलांचा, या पाखरांचा मी आज निरोप घ्यायला आलो होतो, पण मी हा निर्णय माझ्या मनातल्या मनात घेऊनही या माझ्या मित्रांना त्याचा ठाव कसा लागला माहीत नाही. म्हणून या साऱयांनी मिळून माझा निरोप समारंभ आयोजित केला होता, रीतिरिवाजाप्रमाणे मला एक भेटवस्तू दिली होती… ती म्हणजे आपली पहिलीवहिली भेट!





























































