कर्जाच्या आमिषाने एक कोटीची फसवणूक, सोलापुरात एकाला अटक; मृत व्यक्तीसह तिघांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील जवळपास 25-30 जणांची सुमारे 1 कोटी7 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एका मृत व्यक्तीसह तीनजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बजरंग ऊर्फ दीपक बन्सीसिंग लंगडेवाले (मयत), जितेंद्र बन्सी नाईकवाडे व त्यांचा मुलगा सुजित जितेंद्र नाइकवाडे (दोघे रा. कुमठेगाव, ता. उत्तर सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आरोपी जितेंद्र नाईकवाडे यालापोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रविराज सूर्यकांत कदम (रा. देगाव, ता. उत्तर सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव येथे राहणारे रविराज सूर्यकांत कदम यांचा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांची ओळख मयत बजरंग लंगडेवाले व जितेंद्र नाईकवाडे, सुजित नाईकवाडे यांच्याशी झाली होती. आरोपींनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाकडून रविराज कदम यांना 12 कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत 19 लाख 50 हजार रुपये घेतले. त्याचबराबर त्यांचे भाऊ विजय कदम यांनी 10 कोटी मिळवून देतो म्हणून 15 लाख 10 हजार, त्यांचे मित्र चमडा व्यापारी गणेश होटकर यांना साडेतीन कोटी रुपये मिळवून देतो म्हणून साडेतीन लाख रुपये घेतले. यांच्याबरोबरच शहरातील आणखी 25 ते 30 जणांकडून कर्जाचे आमिष दाखवून 1 कोटी 6 लाख 95 हजार रुपये वेळोवेळी घेतले आहेत.

पैसे घेऊनही कर्ज न मिळाल्याने सलगर वस्ती पोलीस ठाण्यात रविराज कदम यांच्यासह फसवणूक झालेल्यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, आरोपी बजरंग लंगडेवाले यांचा नुकताच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी जितेंद्र नाईकवाडे याला अटक केली असून, न्यायालयाकडून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फसवणुकीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता असून, पोलीस नाईक मंद्रूपकर तपास करत आहेत.