संगमनेरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेती साहित्याचे दुकान जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील शिवनंदन एंटरप्राइजेस या शेती साहित्याच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून दुकानातील इलेक्ट्रिक सामानासह, पीव्हीसी पाईप, कॉम्प्युटर साहित्य, मुरघास बॅग व शेतीसाठी लागणारे साहित्य तसेच फर्निचर जळून खाक झाले आहे.

संदीप शिंदे यांचे कोकणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. शनिवारी रात्री दुकानाला आग लागल्याचे शिंदे यांना समजले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शिंदे यांनी आग विझविण्यासाठी गावकऱयांची मदत मागितली. दरम्यान, उपसरपंच अरुण जोंधळे यांनी त्वरित सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व नगरपालिकेचा अग्निशामक बंबांना पाचारण केले.

बंब येईपर्यंत गावातील सर्व तरुणांनी या कामी पुढाकार घेत संदीप शिंदे यांना मदत केली. घटनेची माहिती मिळताच तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी जोंधळे, भीमाशंकर जोंधळे, हनुमंत जोंधळे, दादासाहेब जोंधळे, रंगनाथ बिडवे, योगेश भोसले, अशोक मारुती वायकर, सोमनाथ जोंधळे, संकेत जोंधळे, महेश जोंधळे, चंदू वायकर, ग्रामसेवक बांगर, भीमाशंकर जोंधळे आदींसह गावातील तरुणांनी आग विझविण्यासाठी मदतकार्य केले.