
>> द्वारकानाथ संझगिरी
सध्याचे दिवस दोन हिंदुस्थानी फलंदाजांचे आहेत. एक सूर्यकुमार यादव, दुसरा विराट कोहली. सूर्या टी-20 च्या नभांगणातला सर्वात प्रखर तारा आहे. विराटने तीन वर्षांचा वनवास भोगल्यानंतर आता अर्जुनाप्रमाणे पांचजन्य शंख फुंकला आहे. सचिनच्या विक्रमाचे वेध त्याला लागले आहेत. पुढचे त्याचे दिवस सुगीचे दिसतात. 50 षटकांच्या सामन्याचा फॉरमॅट त्याचा सर्वोत्कृष्ट फॉरमॅट. त्याला शतकाचा रतीब मिळवून दिलेला. त्या फॉरमॅटचे अनेक सामने त्याला मिळणार आहेत. सचिनच्या वनडे शतकांच्या विक्रमापासून तो फक्त 4 शतकांवर आहे. सध्या त्यामुळे स्पोर्ट्स पेजवर दोघांचं राज्य आहे. सूर्याचं कौतुक करताना कपिल देवसारखा माणूसही वाहवत गेला.
तो म्हणाला, सूर्या तू शतकातून एकदा येणारा खेळाडू आहेस. ही जरा जास्तच स्तुती झाली. सूर्या खेळताना पापणी मिटणं हा अडथळा असतो. तरी टी-20 ची फलंदाजी म्हणजे फलंदाजीची संपूर्ण कला नाही. ती तीन मिनिटांच्या सिनेमाच्या गाण्यासारखी किंवा छोटय़ा चटकदार जाहिरातीच्या फिल्मसारखी असते. त्यात शास्त्र्ााrय संगीताची मैफल किंवा मोशन पिक्चरची सर्व समावेशकता नसते. सूर्याचा फलंदाजीतही सध्या तेच आहे. त्याचे ‘विराट’पण अजून दूर आहे.
त्यामुळे कसोटीत यश मिळाल्याशिवाय कुठलाही फलंदाज महानतम होऊ शकत नाही. स्वतः कपिल आजच्या काळात खेळत असता तर त्याने टी-20 मध्ये सूर्याच्या जवळ जाणारी फलंदाजी केली असती. टी-20 मुळे फलंदाजी गेल्या 15 वर्षांत खूप अधिक आक्रमक आणि अविश्वसनीय होत गेली. एबीडीच्या फलंदाजीने तोंडात बोटे घालेपर्यंत सूर्या चार पावले आणखीन पुढे गेला. जे फटके 20 वर्षांपूर्वी स्वप्नातही नव्हते ते आता प्रत्यक्षात पाहतो आणि पुढे काय असा विचार करतो. सूर्या खेळताना त्याला डीप फाईन लेग आणि लाँग लेगमध्ये का क्षेत्ररक्षक ठेवत नाही असे मला वाटते. त्याचे ते ऑफ स्टंप बाहेरून फाईन लेगवर सोडलेले मिसाईल थांबतील, पण मग ज्या जागेचा फिल्डर काढला असेल तो फटाक्यांचा राजमार्ग होईल. परवाच्या त्याच्या शतकाच्या वेळी मैदानावर फक्त मोकळय़ा जागा आहेत असे वाटत होते. क्षेत्ररक्षक शोभा आणायला होते, पण त्याला सचिन, विराट, रिचर्डस्च्या मांडीला मांडी लावून बसायचे असेल तर कसोटीत खेळले पाहिजे. त्याला संधी देऊन पाहावी. तेसुद्धा आजच्या फॉर्मात असताना. मी सूर्या असतो तर ते माझे ध्येय केले असते. तो विराट पाहा, शतकातला फलंदाज होण्यासाठी सज्ज होतोय. फॉर्म आणि आत्मविश्वास मिळाल्याबरोबर धावांची मशीन सुरू झाली. वनडेत लागोपाठ दोन शतके. वनडेच्या फॉरमॅटमध्ये पूर्वीपेक्षा शतक झळकवणे सोपे आहे आणि हिंदुस्थानात तर जास्त सोपे. 11 ते 40 षटकांत फक्त 4 खेळाडू वर्तुळाबाहेर असतात.
त्यात जागतिक क्रिकेटमध्ये गोलंदाजीचा दर्जा पूर्वीपेक्षा खालावलेला आहे. वनडेमध्ये दोन नवे चेंडू असतात. त्यामुळे रिव्हर्स स्विंग गेला. या सर्व गोष्टींचा फायदा विराट जितक्या शिताफीने उचलतो तेवढा इतर नाही करत. 20-25 धावांनंतर शतकाचा रस्ता तो अत्यंत शिताफीने पार करतो. नव्वदीत सहसा अडखळत नाही. त्यामुळे शतक त्याचे सहसा चुकत नाही. त्याचे विराट रूप आता दिसत राहील.



























































