नायलॉन मांजाने गळा कापला, 9 वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मकर संक्रातीच्या दिवशी नायलॉन मांजाने गळा कापल्याने 9 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली. वेद साहू असे बालकाचे नाव आहे. मागील पंधरा दिवसांत नायलॉन मांजामुळे दोन मुले गळा कापला जाऊन जखमी तर एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर अन्य एका घटनेत कटलेली पतंग पकडण्याच्या नादात रेल्वेची धडक बसून मुलाचा मृत्यू झाला आहे.

वेद शनिवारी सायंकाळी त्याच्या वडिलांसोबत दुचाकीवर जात होता. अचानक मांजा आला व त्याचा गळा कापला गेला. त्यात तो जखमी झाला. त्याला मानकापूर येथील इस्पितळात नेण्यात आले, मात्र तेथे उपचार झालेच नाहीत. अखेर रात्री धंतोलीतील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. जखम गंभीर होती व उपचार मिळायला उशीर झाला. अखेर मकर संक्रांतीच्या सकाळीच त्याचा मृत्यू झाला. हसतखेळत असलेल्या वेदवर पालकांच्या डोळ्यांसमोर काळाने घाला घातला.

कटलेली पतंग पकडण्यासाठी मुले रस्त्याने बेभान होऊन धावतात. यात अनेकदा अपघात होण्याच्या घटना घडतात. शनिवारी दुपारी झालेल्या घटनेत कटलेली पतंग पकडण्याच्या नादात रेल्वेची धडक बसून मुलाचा मृत्यू झाला. ही घटना धंतोली पोलीस स्टेशन हद्दीतील पुंभार टोली परिसरात घडली. वंश धुर्वे असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वंश याचे वडील सुरक्षा रक्षक आहेत. वंश हा भिडे हायस्कूलमध्ये सातव्या वर्गात शिकत होता. नागपुरातील राणी दुर्गावती चौक परिसरात सायकलने परत येत असताना मुलाचा गळा कापला गेल्याची घटना घडली होती. शाहनवाज हुसैन मलिक (18) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला 16 टाके पडले. तर 5 वर्षीय मुलीचा गळा कापल्याची घटना शुक्रवार 6 जानेवारी रोजी नागपुरातील फारूक नगर भागात घडली होती. या घटनेतील मुलगी वाचली असून तिला तब्बल 26 टाके पडले.