सोलापुर विद्यापीठात  संपूर्ण परीक्षापद्धती संगणकीकृत होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा सध्या सुरू आहे. या परीक्षांची उत्तरपत्रिका तपासणी हाताने नव्हे, तर संगणकावर ऑनस्क्रिन केली जात आहे. त्यासाठी जिह्यात 17 केंद्रे स्थापन करण्यात आली असून, त्या त्या विषयाचे तज्ञ प्राध्यापक संगणकावर पेपर तपासत आहेत. उत्तरपत्रिका तपासणीतील मानवी हस्तक्षेप कमी व्हावा, त्यावर खाडाखोड करता येऊ नये आणि पारदर्शकता राहावी या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी 109 महाविद्यालये संलग्नित आहेत. विद्यापीठातील कॅम्पस व संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची संख्या पाहाता प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणीला खूप वेळ लागायचा. त्यामुळे निकाल विलंबाने लागल्याने अनेक विद्यार्थ्यांना जॉब तथा पुढील शिक्षणासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता.

या पार्श्वभूमीकर कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणकीस, प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेकार यांच्या मार्गदर्शनाखाली आता विद्यापीठाने ऑनस्क्रिन उत्तरपत्रिका तपासणीची पद्धत अवलंबली आहे. आता 17 केंद्रांवर ऑनस्क्रिन उत्तरपत्रिकांची पडताळणी होईल. त्यामुळे 15 ते 30 दिवसांत निकाल शक्य होणार आहे. विद्यापीठाने त्या संदर्भात प्राध्यापकांना परीक्षेपूर्वीच प्रशिक्षण दिले आहे. यापूर्वी विद्यापीठाने अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांची ऑनस्क्रिन तपासणी केली होती. आता सर्वच अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी त्या पद्धतीने केली जात आहे.

अध्यापनाचा किमान तीन वर्षांचा अनुभव आणि महाविद्यालयांमधील पूर्णवेळ तथा पात्र प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणीचा अधिकार देण्यात आला आहे. विषयनिहाय तज्ञ प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची ऑनस्क्रिन तपासणी केली जात आहे. ऑनस्क्रिन मूल्यमापन म्हणजेच संगणकावर विषयानिहाय सर्व उत्तरपत्रिका स्कॅन केल्या जातात. संगणकावर दिसणाऱया उत्तरपत्रिकांची तपासणी संबंधित प्राध्यापक करतात. विद्यापीठाने ऑनलाइन पाठवलेल्या उत्तरपत्रिकेच्या फॉरमॅटनुसार प्राध्यापक गुणदान करतात आणि त्यांनी दिलेले गुण तेथून आपोआप विद्यापीठाला जातात.

स्पष्ट व पारदर्शक मूल्यमापन व्हावे, विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी निकालासंदर्भात काहीही अडचणी येऊ नयेत आणि त्यांचा निकाल जलदगतीने जाहीर व्हावा, या उद्देशाने विद्यापीठाने यावर्षीपासून 100 ऑनस्क्रिन मूल्यमापन सुरू केले आहे. किमान 25 संगणक व इंटरनेटची सुविधा असलेल्या 17 महाविद्यालयांमध्ये ऑनस्क्रिन मूल्यमापन केंद्रे असतील.

– डॉ. शिवकुमार गणपूर, परीक्षा व मूल्यमापन संचालक, सोलापूर विद्यापीठ.