
सोलापूर शहरातील महापालिकेची परिनहन व्यवस्था मोडकळीस आली आहे. दुसरीकडे कोरोनाकाळात तब्बल एक वर्षभर प्रवासी वाहतूक बंदच राहिली. या पार्श्वभूमीवर पुढील काळात कुटुंबीयांसमवेत कोठेही सोयीने प्रवास करता येईल, या हेतूने स्वत:च्या मालकीचीच वाहने खरेदीकडे कल वाढला आहे. त्यातूनच जिल्ह्यात दरमहा सहा हजार वाहने वाढत असून, त्यात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या अधिक असल्याची बाब समोर आली आहे.
दुचाकी, स्कूटर, मोपेड, मोटार कार, जीप, टॅक्सी, ऑटो रिक्षा, मिनी बस, स्कूल बस, खासगी सेवा देणारी वाहने, रुग्णवाहिका, ट्रक, टँकर, तीन-चारचाकी मालवाहतूक वाहने, ट्रक्टर आणि अन्य वाहनांच्या खरेदीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुलांचे दूरवरील कॉलेजमधील शिक्षण, नोकरीसाठी ये-जा करणे, कामाच्या ठिकाणी तत्काळ पोहचण्याची घाई, शेतमालाची काहतूक करणे, तातडीने शेतीची मशागत करणे, रुग्णसेवा, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक, खासगी प्रवासी वाहतूक अशा विविध कारणांमुळे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
जिल्ह्यातील अनेकजण पुणे-मुंबईला नोकरी तथा शिक्षणाच्या निमित्ताने ये-जा करतात. शेतमाल विक्रीसाठी अनेकजण शहरातील बाजार समित्यांमध्ये येतात. ग्रामीण भागातील अनेक मुले शहरातील शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.
शहरात सध्या 16 हजारांवर रिक्षा असून, ग्रामीणमध्येही त्याची संख्या सहा हजारांपर्यंत आहे. खासगी प्रवासी वाहनांतून प्रवास करण्याऐवजी अनेकांनी स्वत:च्या सोयीसाठी मालकीची वाहने घेतली आहेत. छोटय़ा-मोठय़ा कामांसाठी वाहनांचा वापर केला जातो, अशी स्थिती आहे.




























































