इस्रोकडून कमी वजनाच्या एसएसएलव्हीचं यशस्वी प्रक्षेपण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रोने शुक्रवारी आणखी एक यशस्वी कामगिरी पार पाडली आहे. इस्रोने एसएसएलव्ही (स्मॉल सॅटेलाईट लाँच वेहिकल) तीन उपग्रहांसह अवकाशात प्रक्षेपित केलं आहे.

एसएसएलव्हीचं हे दुसरं यशस्वी प्रक्षेपण आहे. या रॉकेटला हलक्या वजनाच्या उपग्रहांना पृथ्वीच्या जवळील कक्षेत प्रक्षेपित करण्यासाठी निर्माण करण्यात आलं आहे. त्यामुळे पोलार सॅटेलाईट लाँच वेहिकलवरील भार कमी होणार आहे. तसंच कमी खर्चात हलक्या उपग्रहांना अंतराळात पोहोचवणं शक्य होणार आहे.

एसएसएलव्हीचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यावरचा कमी खर्च हे आहे. या रॉकेटला उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी कमी वेळात तयार करता येऊ शकतं. अतिशय कमी साधनसामग्रीत हे रॉकेट तयार होतं. त्यासोबत एकावेळी एकाहून अधिक उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करता येतात. या रॉकेटचा वापर जगभरातील ग्राहकांकडून पृथ्वीच्या 500 किमी कक्षेत छोटे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी केला जाऊ शकतो.