
ठाणे महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Thane Assistant municipal commissioner Mahesh Ahe) यांच्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. ठाणे सत्र न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर झालेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची हत्या करण्याची सुपारी महेश आहेर यांनी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महेश आहेर यांना पालिका मुख्यालयाबाहेर मारहाण केली होती.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याचा कट समोर आला आहे. या संदर्भातील एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. तिहार तुरुंगामध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केल्याची कबुली देणारी ठाणे महापालिकेतील वादग्रस्त सहायक आयुक्त महेश आहेर यांची ही ऑडिओ क्लिप आहे. या ऑडिओ क्लिपमुळे ठाण्यात प्रचंड खळबळ माजली. या ऑडिओ क्लिपमधील आवाज महेश आहेर यांचा असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आहेर यांना पालिका मुख्यालयाबाहेर गाठत त्यांना पोलिसांसमोरच मारहाण केली होती.



























































