
>> अशोक उजळंबकर
सन 1913 ला दादासाहेब फाळके यांनी पहिल्या मूकपटाची निर्मिती केली. ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला चित्रपट. त्यानंतर अनेक चित्रपटांची निर्मिती झाली. नंतरच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज मराठी कलाकार आले. प्रत्येक कलावंताचा स्वतःचा एक वेगळा प्रवास असतो. प्रत्येक कलाकाराने करिअरच्या प्रारंभी संघर्ष केलेला असतो. त्याच्या यशाला, झगमगाटाला भुलणाऱया सर्वसामान्यांना त्यामागची तपश्चर्या, सतत चिकाटीने केलेले प्रयत्न, संघर्ष दिसत नाहीत. रसिकांना आपल्या दिग्गज कलावंतांचा प्रवास कळावा, हेच ‘चित्रकर्मी’ या पुस्तकाचे वैशिष्टय़ आहे. या पुस्तकातून रसिकप्रिय असणाऱया दिग्गज 30 कलावंताचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
क्षेत्र कोणतेही असो, त्यात यशस्वी होताना कष्टाशिवाय तरणोपाय नाही. सातत्य, चिकाटी, जिद्द यांच्या जोरावर यशाला गवसणी घालणे अवघड नसते. आशिष निनगुरकर यांनी हाच धागा पकडून ‘चित्रकर्मी’ हे चंदेरी दुनियेतील विविध नायक, नायिका, दिग्दर्शक यांचा जीवनपट उलगडून दाखविणारे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे. एकूण 30 कलावंतांचा संक्षिप्त, पण कमालीचा बोलका जीवनप्रवास लेखक आशिष निनगुरकर यांनी ‘चित्रकर्मी’ या पुस्तकातून मांडला असून हे सर्व कलाकार मराठी चित्रपटसृष्टीतील रंगकर्मी आहेत.
आशिष निनगुरकर यांनी कमीतकमी शब्दांत या चित्रकर्मींच्या अभिनय क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला आहे. त्यात सदाशिव अमरापूरकर, रवी पटवर्धन, दादा कोंडके, जयश्री गडकर, कुलदीप पवार यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील 30 कलाकारांचा समावेश आहे. ‘चित्रकर्मी’ हे पुस्तक अभिनय क्षेत्रात करिअर करू पाहणाऱयांबरोबरच सामान्य रसिक वाचकांसाठी मेजवाणी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

























































