
>>महेंद्र पाटील
आता मनात का उठला हा कल्लोळ भावनांचा, आता मनात का उरला हा खेळ सावल्यांचा… हे शब्द आजची संध्याकाळ उलटून गेल्यावर अलगदपणे माझ्या मनात अवतरले. तसं गेल्या काही दिवसांत माझ्या मनाचं आणि या सृष्टीतील सप्तरंगांचं भांडण सुरू होतंच. त्यामुळे कधीतरी मनाला हा प्रश्न पडणं स्वाभाविक होतं. माझं मन बिचारं आजच्या संध्याकाळी नेहमीसारखं नाहीये. कारण त्याने आजवर जे काही भोगलं, जे काही सोसलं आणि ज्या वाटेवरून ते प्रवास करून आपली एक वेगळी वाट निर्माण करत पुढे जाऊ लागलं, त्याच मनाला आज एका वळणावर येऊन जरा थांबावंसं वाटलं. मग मी पण त्याला थांबून विचार करू दिला.
मी त्याची शांतपणे गंमत पाहात पाहत होते. चंद्र आपल्या अथांग प्रकाशाने रात्रीच्या अंधाराला वरचढ ठरू पाहात होता, पण त्याला काय ठाऊक, रात्र फक्त सूर्यालाच मानते. चंद्राच्या प्रकाशाचं आणि अंधाराचं जसं नातं आहे, तसंच आपल्या बुद्धीचं आणि आपल्या मनाचं नातं आहे. मन बुद्धीला कधीच वरचढ होऊ देत नाही, पण मनावर एखादं मनच वरचढ ठरू शकतं. अशा विचारात रात्र हळूहळू पुढे सरकत होती आणि अंधार पसरू लागला होता. मन विचारमग्न आणि शांत शांत. नेहमी बडबडणारं, हसणारं, हसवणारं मन आज शांत असल्यामुळे सारा आसमंत थक्क होता. एक-एक पार केलेलं वळण, वेगवेगळय़ा वळणावर भेटलेली वेगवेगळी माणसं आणि त्यांच्या सोबत घालवलेले काही क्षण, काही दिवस, काही महिने, काही वर्षे, एक तप ओलांडून गेलेल्या जुन्या आठवणी आणि काही आठवणींतून आपल्याला भेटणारी, आठवणीत कायम राहणारी माणसं, सुने सुने पावसाळे, तप्त उन्हाच्या झळा, गोडगुलाबी थंडी, धूसर धुक्यातली कोवळी पहाट, आपल्या मनाची झालेली घालमेल, त्याने एखाद्या नात्यासाठी केलेला आटापिटा, वेळप्रसंगी केलेला त्याग, मनातल्या मनात आवर घातलेल्या बंदिस्त भावना, अशा गोष्टींचा विचार माझं मन करू लागलं तेव्हा त्याला जाणीव झाली की, आपण खूप सुंदर आयुष्य जगत आलोय… जगतोय, पण कुणासाठी, कशासाठी आणि स्वतःसाठी आपण कधी जगलो का काही क्षण? स्वतःचा विचार केला का कधी? केला तर किती केला?
दिवस ढळून गेल्यावर हळूहळू मनात काहूर माजू लागलं. मन आपल्यापरीने चालत असताना काही वळणे अशी आली की, त्याला ठेच लागली. पायाला लागलेली ठेच बरी होते, पण मनाला लागलेली ठेच कायमस्वरूपी तशीच राहते. काही ठराविक अंतरानंतर ठेचा लागू लागल्या अन् मन घायाळ होऊ लागलं. सृष्टीतील सर्व गोड गोष्टींची सवय असलेल्या मनाला अशा प्रकारच्या ठेचा वारंवार लागणं परवडणार नव्हतं. म्हणून अचानक त्याची पावलं मंदावली आणि मन थांबलं स्वतःसाठी. कुणाच्या आठवणी, कुणाच्या भावना, प्रश्न, समज-गैरसमज, रुसवा, राग, कुणी उगाचंच आपल्या मनावर हक्क गाजवणं या सगळय़ाच गोष्टीला मन आता पंटाळल होतं. गेल्या काही वर्षांचा जमा-खर्च मांडत बसलंय. मन आणि त्यात स्वतःला किती वजा केलं आहे हे पाहून स्वतःवर हसावं की रडावं, हे पण त्याला कळत नाहीये.
इतपंही खुळं नसावं कधी ज्याने आपलाच आपल्याला त्रास होईल. कारण येणारे ऋतू येतात आणि जातात, पण मनाला त्याच्या वेगवेगळय़ा रंगांप्रमाणे जगावं लागतं. असं जगता जगता कधीतरी स्वतःचं अस्तित्व हरवून जातं. या सृष्टीत आपण आपलाच रंग शोधू लागतो, पण तो सहजासहजी सापडत नाही. कारण प्रत्येकाच्या मनाला जपता जपता त्या मनात मिसळून जायचं. अगदी आपलं मानून सर्व काही अर्पण करायचं आणि स्वतः मात्र हरवून जायचं. आपल्याच मनाचे किनारे शोधत राहायचं. आजन्म… कुणी सांगितला हा खटाटोप असं बुद्धी मनाला नेहमी सांगायची, पण मन मात्र ऐकत नव्हतं. आज त्यालाही तिचा दूर दृष्टिकोन समजला असेल. आपण लाख झोकून दिलं तरी आपल्यासोबत चालणारं मन, आपल्याला भेटणारी माणसं, आपल्या रंगात रंगून जातील की नाही याची खात्री देता येत नाही. आपण उगीच कशाला आपले रंग हरवून बसायचे. सर्व काही परत येतं, पण हरवलेले रंग, हरवलेल्या मनाचे किनारे कधी सापडत नाहीत. आपली वाट पाहून ते खूप दूर निघून जातात. क्षितिजापलीकडे… आणि मन असं अर्ध्या रात्री बेचैन होऊन एकाकी विचार करत राहतं. मग जुळतात नवीन शब्द, लिहिलं जातं एखादं नवं गाणं… जुन्या आठवणींचं…
आता मनात का उठला हा कल्लोळ भावनांचा
आता मनात का उरला हा खेळ सावल्यांचा
पुन्हा मनात गर्दी का दाटते नव्या विचारांची
पुन्हा मनाला का ओढ वाटते जुन्या किनाऱयांची…





























































