
‘करीअर घडविण्यात सातत्याने येणाऱया अपयशामुळे मी आत्महत्या करीत आहे. परंतु मरण्यापूर्वी मला अवयवदान करायचे आहे…’ अशा स्वरूपाचे ट्विट करून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात एक 26 वर्षीय तरुण होता. पण मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने वेळीच त्याला शोधून त्याचे मनपरिवर्तन केले.
किरण (नाव बदललेले) याने तो आत्महत्या करणार असून त्यापूर्वी त्याला अवयवदान करायचे असल्याचे ट्विट केले होते. त्याच्या अशा ट्विटमुळे खळबळ उडाली होती. याची तत्काळ गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके बनवून किरणचा शोध सुरू केला. युनिट-5चे प्रभारी निरीक्षक घनश्याम नायर, निरीक्षक अजित गोंधळी,अभिजित शिंदे, सपोनि शहापूरकर, उत्कर्ष वझे व पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती गोळा करून किरणला कर्जत रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले.
मग त्याचे समुपदेशन करून त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. किरण याने विज्ञान शाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले असून त्याला नोकरी व व्यवसायात सातत्याने अपयश आल्याने त्याचे मनोधैर्य खचले आहे. त्यातूनच तो आत्महत्या करणार होता असे पोलिसांकडून सांगण्यात येते. युनिट-5 च्या पथकाने चारच दिवसांपूर्वी अशा प्रकारे आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या इंजिनीअर तरुणाला शोधून त्याला टोकाचे पाऊल उचलण्यापासून रोखले होते.






























































