Mumbai Air Quality: सावधान! मुंबईकरांना धोक्याची घंटा, हवेतील वाढत्या प्रदूषणाचा आरोग्यास फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहरात राहणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईत दिवसेंदिवस दिल्लीप्रमाणेच प्रदूषणाचा विळखा वाढत चालला आहे. हवामान खात्याने मुंबईसह उपनगरांच्या हवेच्या गुणवत्तेबद्दल माहिती दिली असून आज म्हणजेच सोमवारी मुंबईतल्या हवेची गुणवत्ता पातळी अतिशय खाली आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान हवामान खात्याने मुंबईसह उपनगरांच्या हवेच्या गुणवत्तेची देखील माहिती दिली आहे. मुंबईमध्ये 253 AQI इतक्या दूषित हवेची नोंद करण्यात आली आहे. मुंबईपेक्षा नवी मुंबईतली हवा अधिक प्रदुषित असल्याचं समोर आलं आहे. नवी मुंबईत 332 AQI दूषित हवेची नोंद झाली आहे. 2022 आणि 2021 च्या तुलनेत खराब हवेच्या गुणवत्तेत ही आता लक्षणीय वाढ होत असल्याचे समोर आले आहे. तसेच वायू प्रदूषणात वाढ होण्यामागे वाहतुकीसह रिअल इस्टेट, परिसरातले कारखाने आणि पायाभूत सुविधांची कामे ही प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

चेंबूरमध्ये हवेची गुणवत्ता अधिक खालावली असून कुलाब्यातली हवेची गुणवत्ताही गंभीर प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे हवामान विभागाकड़ून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं हवामान विभागाने म्हटलं असून मुंबईची हवा अत्यंत वाईट पातळीवर गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे श्वसनाचा त्रास असलेल्या नागरिकांनी स्वत:ची विशेष काळजी घ्यावी असं आवाहन  हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करत केलं आहे.