
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या गुप्त माहितीच्या आधारे इंटेलिजन्स आणि इंदूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी संशयित दहशतवादी सरफराज मेमनला अटक केली आहे. इंदूरच्या चंदन नगरमध्ये रविवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. तो 12 वर्षांपासून हाँगकाँगमध्ये राहत असल्याचे सुरक्षा यंत्रणांना सांगण्यात आले होते. सरफराज मेमनने पाकिस्तान आणि चीनमधून दहशतवादी प्रशिक्षण घेतले होते. तो हिंदुस्थानात मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होता. आता मुंबई एटीएस सरफराजची चौकशी करणार आहे.
एनआयएच्या इनपुटनंतर मुंबई पोलिसांना मेमनची माहिती देण्यात आली. तो मुंबईचा रहिवासी असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. मुंबई एटीएसने इंदूरचे इंटेलिजन्स डीसीपी रजत सकलेचा यांना माहिती दिली की सरफराज हा मूळचा ग्रीन पार्क कॉलनी, चंदन नगर येथील फातमा अपार्टमेंटचा रहिवासी आहे. त्यानुसार चंदननगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्रथम त्याच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशिरा त्याने स्वत: पोलीस ठाणे गाठले. सध्या पोलीस सरफराजची चौकशी करत आहेत.
याबद्दल मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, एनआयएच्या इनपुटवर इंदूर पोलिसांनी संशयित सरफराज मेमनला ताब्यात घेतले आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. इंदूरच्या चंदन नगर पोलीस स्टेशन परिसरातील ग्रीन पार्क कॉलनीत राहणारा सरफराज मेमन दहशतवादी प्रशिक्षण घेऊन हिंदुस्थानात परतला होता. तो येथूनच देशात मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट रचत होता.




























































