
इंदूर इथे हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात हिंदुस्थानी संघाने नाणेफेक जिंकत पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय हिंदुस्थानी संघासाठी महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या 1 तासात यजमान संघाचे 5 बळी बाद झाले आहेत. अवघ्या 45 धावांमध्ये हिंदुस्थानी संघाने 5 विकेट गमावल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंनी सुरेख गोलंदाजी करत हिंदुस्थानी फलंदाजांना जखडून ठेवलं होतं. मायदेशातील पिचवर हिंदुस्थानी फलंदाज बॉलचा टप्पा कुठे पडेल आणि कसा वळेल हे हेरण्यात फेल ठरल्याचे दिसून येत होते. हिंदुस्थानी संघाला पहिला धक्का हा 5.6 व्या षटकांत बसला. हिंदुस्थानची धावसंख्या 27 असताना रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर हिंदुस्थानची घसरगुंडीच उडाली. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू कुन्हेनमन याने 3 बळी टीपले तर नाथन लायन याने 2 बळी टीपले.
- 1-27 रोहित शर्मा, 5.6 षटक
- 2-34 शुभमन गिल, 7.2 षटक
- 3-36 चेतेश्वर पुजारा, 8.2 षटक
- 4-44 रवींद्र जडेजा, 10.5 षटक
- 5-45 श्रेयस अय्यर, 11.2 षटक
चार सामन्यांच्या मालिकेत यजमान हिंदुस्थानने पहिल्या दोन्ही कसोटींमध्ये पाहुण्या संघाला अडीच दिवसांतच पराभूत केले होते. तिसरी कसोटी जिंकल्यास टीम इंडिया चौथ्यांदा बॉर्डर-गावसकर करंडकावर आपले नाव कोरणार आहे. याचबरोबर कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे फायनलचे तिकीटही बुक करू शकेल. त्यामुळे हिंदुस्थानसाठी या कसोटीतील विजय अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कर्णधार पॅट कमिन्स आईच्या आजारपणामुळे मायदेशी परतल्याने अनुभवी स्टीव्ह स्मिथकडे ऑस्ट्रेलियन संघाची धुरा आली आहे, मात्र अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर जायबंदी झाल्याने उर्वरित मालिकेस मुकणार असल्याने ऑस्ट्रेलियाला याचा फटका बसणार आहे. वॉर्नर फॉर्ममध्ये नसला तरी त्याचा दिवस असल्यास कुठल्याही खेळपट्टीवर तो गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरू शकतो. वॉर्नरच्या जागेवर मॅट रेनशॉ खेळणार असला तरी फिरकी गोलंदाजी खेळणे त्याला आतापर्यंत झेपलेले नाही. त्यामुळे या खडतर दौऱ्यावर अनेक स्टार खेळाडू संघात नसल्याचा फटका ऑस्ट्रेलियाला बसला आहे. कमिन्सच्या जागेवर मिचेल स्टार्क खेळण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानातील स्टार्कचे रेकॉर्ड चांगले नसले तरी तो फलंदाजीतही योगदान देऊ शकतो.

























































