वाचनसंस्कृती – अलेक्झांडर द ग्रेटची प्रेरणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. वर्षा चोपडे

जगातील सर्वात जुने ज्ञात ग्रंथालय हे सातव्या शतकातील इराकचे अशुरबानिपालचे ग्रंथालय मानले जाते. आधुनिक इराकमधील निनवेह येथे स्थित. या ग्रंथालयात सुमारे 30 हजार क्युनिफॉर्म गोळा साहित्याचा समावेश आहे. क्युनिफॉर्म हे सर्वात जुने लेखन प्रकारांपैकी एक आहे. चिकणमाती, काहीशा कडक अवस्थेत वाळल्यावर लिहिण्यासाठी एक बारीक पृष्ठभाग तयार केला जायचा आणि त्यावर नोंदी आणि माहिती लिहिण्यात यायची. हे अनोखे आणि भव्य ग्रंथालय राजघराण्यांसाठी तयार करण्यात आले होते आणि त्यात राजांचा खास वैयक्तिक संग्रह होता. हे ग्रंथालय पुजारी आणि विद्वानांसाठीदेखील खुले होते. या ग्रंथालयाला राजा अशुरबानिपाल यांचे नाव देण्यात आले. अशुरबानिपाल हे एक उत्कृष्ट गणितज्ञ होते आणि अक्कडियन आणि सुमेरियन या दोन्ही भाषेतील क्युनिफॉर्म लिपी वाचण्यास सक्षम असलेल्या मोजक्या राजांपैकी एक होते. प्राचीन ‘पुस्तके’ अशुरबानिपाल यांच्या मालकीची होती. ज्यांनी 668 ईसापूर्व ते सुमारे 630 ईसापूर्व अश्शूरच्या प्राचीन राज्यांवर राज्य केले. ते निओ-असिरियन साम्राज्याचे शेवटचे महान राजे होते. तो वाचन आणि लेखनात प्रभुत्व मिळवणारा पहिला अश्शूर राजा. याच ऍसिरियन लोकांना नंतर सीरियन म्हटले गेले. त्यांनी तेराशे वर्षे आपले साम्राज्य केले. आशुरबानिपाल हा शेवटचा महत्त्वाचा ऍसिरियन राजा. शिल्पकला आणि घोडेस्वारीमध्ये हा राजा तरबेज होता. या ग्रंथालयातील शिलालेखात असे लिहिले आहे की, जर कोणी लायब्ररीच्या पाटय़ा किंवा साहित्य चोरले तर चोरास देव भयंकर शिक्षा देईल.

इतिहासकारांकडून असा निष्कर्ष काढला की, 612 व्या शतकाच्या दरम्यान निनवेह राज्य नष्ट झाल्यावर ऐतिहासिक ग्रंथालय आगीत जळून खाक झाले असावे. तथापि, 1849 ईसापूर्वमध्ये त्यांचा पुनर्शोध होईपर्यंत पुढील दोन सहस्राब्दी साहित्य जतन केले गेले. फायर्ड क्ले क्युनिफॉर्म गोळा, दगडी प्रिझम आणि सिलिंडर सील आणि डिप्टीच नावाच्या मेणाच्या लाकडी लेखन बोर्डांचा समावेश हे ग्रंथालयाचे विशेष आहे. निनवेह येथील नैऋत्य राजवाडय़ाच्या भिंतीवरील भित्तिचित्रे आणि निमरुद येथील मध्यवर्ती राजवाडय़ात पपायरस चर्मपत्रांवर अरामी भाषेत मजकूर लिहिले आहेत.

ब्रिटिश म्युझियमच्या म्हणण्यानुसार, पूर्वेकडील प्राचीन संस्कृतीच्या अभ्यासात ग्रंथांना ‘अतुलनीय महत्त्व’ आहे, त्यामुळे या ग्रंथालयातील अनेक दालनं सध्या अभ्यासासाठी ठेवलेली आहेत. आधुनिक काळातील उत्तर इराकमध्ये मोसुल शहराजवळ हे ग्रंथालय बांधले आहे. ग्रंथालयातील बरेच साहित्य हे नेनेवेह येथील कोयुनजिक येथे आहे. हे पुरातत्त्व स्थळ सर ऑस्टेन हेन्री लेयार्ड या एका इंग्लिश प्रवासी आणि पुरातत्त्वशास्त्र्ाज्ञाने शोधून काढले होते. काही सिद्धांतांनुसार अलेक्झांड्रिया लायब्ररी अशुरबानिपालच्या लायब्ररीपासून प्रेरित होती. अलेक्झांडर द ग्रेट हे ग्रंथालय पाहून आनंदित झाला आणि त्याला त्याच्या राज्यात असेच एक ग्रंथालय निर्माण करण्याची इच्छा निर्माण झाली. या ग्रंथालयातील बहुतेक मजकूर मुख्यत्वे अक्कडियन भाषेत क्युनिफॉर्म लिपीमध्ये लिहिलेले आहेत, तर इतर ऍसिरियनमध्ये लिहिलेले आहेत. लायब्ररीच्या मूळ सामग्रीचे बरेच नुकसान झाले आहे आणि तशीच पुनर्बांधणी करणे अशक्य आहे. अनेक टॅब्लेट आणि लेखन फलकांचे नुकसान झाले आहे. राजा रबानिपालने सर्व कोरलेल्या आणि मातीच्या गोळय़ांची, त्यांच्या रहस्यांची आणि अडचणींची काळजी घेतली होती आणि समृद्ध ग्रंथालय निर्मिती केली होती.

अशुरबानिपाल लायब्ररी प्रकल्पाची सुरुवात 2002 मध्ये मोसुल विद्यापीठाचे डॉ. अली यासीन यांनी केली. त्यानंतर हेन्री क्रेस्विक रॉलिन्सनसोबत काम करणारे पुरातत्त्वशास्त्र्ाज्ञ होर्मुझद रासम यांना हजारो गोळय़ांरूपी साहित्य शोधाचे श्रेय दिले जाते. ग्रंथालये नष्ट करणे म्हणजे ज्ञानाचा अपमान आणि क्रूर थट्टा आहे. ग्रंथालयाला ज्ञानाचे मंदिर म्हटले जाते, पण त्याचे संवर्धनही तितकेच आवश्यक आहे.
[email protected]