हिंदुस्थानने इराण जिंकले, ज्युनियर जागतिक कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत फडकला तिरंगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - जितेश शिरवडकर

वादग्रस्त निर्णयांमुळे खेळाडूंचे पंचांशी उडालेले खटके… यजमान देशाच्या खेळाडूंच्या बाजूने दिलेल्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केल्यामुळे मिळालेले कार्ड… सर्व स्टेडियम इराणच्या बाजूने असताना, तसेच पिछाडीनंतरही हिंदुस्थानच्या ज्युनियर्सनी भन्नाट- सुसाट खेळ करत यजमान इराणचा 41-33 असा पराभव केला आणि दुसर्‍या ज्युनियर जागतिक कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानचा तिरंगा डौलाने फडकावला.

हिंदुस्थाननंतर कबड्डीवर खर्‍या अर्थाने मनापासून प्रेम कोण करतो ? या प्रश्नाचे उत्तर पुन्हा एकदा मिळाले. इराणच्या ज्युनियर संघाने हिंदुस्थानी खेळाडूंच्या तोडीस तोड कामगिरी करीत हम भी कुछ कम नहीं है, हे कबड्डी विश्वाला दाखवून दिले. ज्युनियर स्पर्धेचे पहिले जेतेपद जिंकणार्‍या इराणला दुसरे जेतेपद राखता आले नाही. पहिल्या स्पर्धेत हिंदुस्थान सहभागी होऊ शकला नव्हता. मात्र यंदा हिंदुस्थानने आपला सहभाग नोंदवला आणि आपल्या खेळाडूंनीr इराणचा कडवा संघर्ष मोडून काढत रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते है, नाम है हिंदुस्थान… हे दाखवून दिले.

इराणच्या उर्मिया शहरात झालेल्या ज्युनियर जागतिक कबड्डी स्पर्धेच्या अंतिम लढतीत हिंदुस्थान आणि इराण यांच्यात खटकेपूर्ण सामना रंगला. काल हिंदुस्थानने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता तर इराणने नेपाळचा सहज पराभव पहिल्या सत्रात इराणचे खेळाडू जोरदार खेळ करत होते, तसेच पंचांशी वारंवार हुज्जतही घालत होते. त्यातच पंचांनी काही निर्णयांबाबत इराणला झुकते माप दिल्यामुळे हिंदुस्थानी खेळाडूंनीही संघर्षाचा पवित्रा घेतल्याचे दिसले. पण याचा फटका हिंदुस्थानी खेळाडूंना कार्डाच्या रूपाने मिळाला. वादग्रस्त आणि संघर्षपूर्ण खेळाच्या पहिल्या सत्रात इराण हिंदुस्थानपेक्षा काकणभर सरस ठरला. एवढेच नव्हे तर पहिल्या दहा मिनीटांतच हिंदुस्थानवर लोण चढवण्याचाही करिश्मा इराणने दाखवल्यामुळे मध्यंतराला खेळ थांबला तेव्हा इराण 19-18 असा आघाडीवर होता.

मध्यंतरानंतर हिंदुस्थानने वेगळी रणनीति आजमावत इराणच्या बचावफळीवर हल्ला चढवला. नरेंदर कंडोला, मनजीत शर्मा आणि जय भगवानने आपल्या आक्रमक चढाईच्या जोरावर इराणवर लोण चढवत आघाडी घेतली. पण या आघाडीनंतर इराणचे खेळाडू आणखी आक्रमक झाले आणि त्यांनीही जोरदार खेळ केला. दोघांमध्ये आघाडीसाठी प्रचंड झटापट पाहायला मिळाली.

शेवटच्या पाच मिनिटांत हिंदुस्थान सुसाट

हिंदुस्थानने मध्यंतरानंतर घेतलेली आघाडी झुंजार खेळ करीत शेवटपर्यंत नुसती राखली नाही तर वाढवलीसुद्धा. शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना हिंदुस्थान 33-30 असा आघाडीवर होता. पण या पाच मिनिटांत त्यांनी भन्नाट चढाया आणि मगरमिठी (सुपर टॅकल) मारत सामन्यावर अशी पकड घेतली की ती इराणला सोडवताच आली नाही. हिंदुस्थानने वेगवान चढाया करत शेवटच्या मिनिटाला 41-33 अशा गुणांसह इराणवर मात केली आणि कबड्डीच्या जागतिक स्पर्धेवर आपले नाव कोरले.

अजूनही कबड्डी मागेच

ऑलिम्पिकचे स्वप्न पाहात असलेल्या कबड्डीने ज्युनियर जागतिक अिंजक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने दाखवलेली ताकद पाहून कबड्डी फार मागे असल्याचे दिसले. या स्पर्धेत 12 संघांचा सहभाग होता आणि या स्पर्धेच्या पूर्वसंध्येलाही संघाच्या सहभागाबाबत अनिश्चितता दिसून आली.जे संघ खेळले त्यात हिंदुस्थान, इराण, बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळ या संघांनाच कबड्डी खेळता येत असल्याचे दिसले. अन्य संघांना धरून-पकडून गाठायला भाग पाडले, असेच वाटत होते. स्पर्धा जागतिक असली तरी स्पर्धेत दिसलेला खेळ बालवाडीतल्या मुलांसारखाच झाला. पूर्ण स्पर्धेत दोन-तीन सामनेच रंगले, हे या स्पर्धेचे अपयशच म्हणावे लागेल.