
मेटा या कंपनीचं फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग अॅप्लिकेशन असलेल्या इन्स्टाग्रामचा सर्व्हर डाऊन झाल्याने गुरुवारी युजर्स हैराण झाले. 46 हजारहून अधिक युजर्सनी इन्स्टाग्राम चालत नसल्याची तक्रार केली आहे.
गुरुवारी इन्स्टाग्रामची सेवा ठप्प झाली. अनेकांना अॅप्लिकेशन वापरण्यास अडचणी येऊ लागल्या. याचा थेट परिणाम अमेरिकन युजर्सवर झाला आहे. अनेक युजर्स सोशल मीडियाच्या अन्य वेबसाईटवर इन्स्टाग्राम चालत नसल्याची तक्रार करत होते. यात दोन हजार युजर्स हे युनायटेड किंग्डमचे होते. तर 1 हजार युजर्स हे हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियातील आहेत.
एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, अॅप्लिकेशन डाऊन का झालं त्याचं खरं कारण अद्याप कळलेलं नाही. मेटातर्फे देखील कोणतंही स्पष्टीकरण अथवा माहिती देण्यात आलेली नाही. सोशल मीडियाच्या अन्य प्लॅटफॉर्म्सवर युजर्स इन्स्टाग्रामच्या सर्व्हरविषयी तक्रार करत आहेत. अर्थात इन्स्टाग्राम बंद पडण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी ही अशा प्रकारच्या समस्येने इन्स्टाग्राम युजर्स मेटाकुटीला आले होते.





























































