
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाला विधानसभेत सोमवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोध दर्शवला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ असल्याची टीका अजित पवारांनी केली. तसेच यावेळी त्यांनी मिंधे आणि भाजपला टोलाही लगावला आहे. अजित पवार म्हणाले, संत तुकाराम महाराज यांच्या शब्दांत अर्थसंकल्पाचं वर्णन करायचे असेल तर, ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, जेवूनिया तृप्त कोणी झाला,’ असे करावे लागेल. हा अर्थसंकल्प म्हणजे पूर्ण न होणाऱ्या घोषणांचा पाऊस आहे. यातून कोणालाही दिलासा मिळणार नाही, असं माझे मत आहे, असे ते म्हणाले.
अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी, योजना पुढे गेल्या पाहिजेत, याची काळजी अर्थमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे होती. मागील वर्षी ‘पंचसुत्री’च्या आधारावर अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ‘पंचामृत’ असे नाव दिले. कुठेही पुजेला गेले की थोडेसे ‘पंचामृत’ देतात. ते झाल्यावर प्रसाद देतात. त्यानंतर महाप्रसाद असतो. म्हणजे आम्हा सर्वांना ‘पंचामृत’ दिले. एकनाथ शिंदेंच्या गटाला प्रसाद दिला. प्रसादानंतर जेवण म्हणजेच महाप्रसाद असतो, तो भाजपवाल्यांना पोटभरून दिला आहे. भाजपावाल्यांना महाप्रसाद, एकनाथ शिंदेंना प्रसाद आणि आम्हाला थोडं, थोडं पंचामृत देण्यात आले, अशा शब्दांत अजित पवार यांनी सभागृहात टोला लगावला.
देवेंद्र फडणवीसांकडून ही अपेक्षा नव्हती. सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करता. पण, येथे असं का झालं माहिती नाही. कोणतीही अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी आर्थिक धोरणात सातत्य आणि स्पष्टता लागते. तुमच्या आर्थिक धोरणाकडे जगाचे लक्ष असते. परकीय गुंतवणूक आणि औद्योगिक प्रगतीही अवलंबून असते, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.































































