रंगभूमी – एक नाटकवेडी लेखणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>संजय कुळकर्णी

ज्येष्ठ नाटय़ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे नुकतेच निधन झाले. नाटक कसं आणि कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं याचा पाठच त्यांच्या समीक्षेतून मिळायचा. रंगभूमीवर प्रेम करणाऱया नाडकर्णींना प्रायोगिक रंगभूमीबाबत जास्त आस्था होती. त्यांच्या जाण्याने रंगभूमीकडे अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून पाहणारं एक पर्व संपलं.

शनिवारी रात्री 10च्या सुमारास अशोक मुळ्ये यांचा पह्न आला. ‘‘कमलाकर नाडकर्णी गेले’’ हे त्यांचं बोलणं ऐकल्यावर नमिता…त्यांची मुलगी…तिला पह्न लावला. तिनं सांगितलं ‘‘बाबा दोन-तीन महिने फारच क्रिटिकल होते. आज रात्री 10 वाजता गेले.’’ वयाच्या 88 व्या वर्षी कमलाकर नाडकर्णी यांनी अखेरचा श्वास घेतला. वयोवृद्ध जरी ते झालेले असले तरी त्यांच्याकडे लिहिण्याची ऊर्जा होती. सदा हसतमुख आणि गप्पा मारणारे. आज ते हयात नाहीत हे मनाला पटत नाही. हसतमुख व्यक्तिमत्त्व लोप पावलं. ते जरी गेले असले तरी त्यांनी लिहिलेले लेख, नाटय़ समीक्षा हा एक ग्रंथ म्हणून त्याकडे यापुढे पाहिलं जाईल. त्यांच्या आठवणी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून वाचता येतील. संदर्भ म्हणूनदेखील ते मिळू शकतील. आज हे लिहीत असताना मागे वळून पाहताना त्यांच्या अनेक आठवणी आणि त्यांच्याबरोबर झालेला सहवास आठवणींच्या हिंदोळय़ावर पिंगा घालू लागतात.

कमलाकर नाडकर्णी यांना सर्वप्रथम पाहिलं ते राज्य स्पर्धेतील ‘जुलूस’ या नाटकात. त्यांची भूमिका अजूनही लक्षात राहणारी. बहुरूपी या संस्थेनं ते नाटक स्पर्धेत सादर केलं होतं. त्या वर्षातील स्पर्धा ही तगडी होती. त्यानंतर ‘काका किश्याचा’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर  पाहिलं. किशोर प्रधान, महेश गोंधळेकर आणि कमलाकर नाडकर्णी या त्रिमूर्तींनी प्रयोग पाहताना इतपं हसवलं की, पूछो मत! ‘काका किश्याचा’ हा भन्नाट फार्स होता. त्यानंतर या नाटकाचे व्यावसायिक रंगभूमीवर अनेक प्रयोग झाले. त्यात भूमिका करताना ते रमलेले दिसले. सुधा करमरकर यांच्या ‘सर्कशीतील चिमणराव’ या बालनाटय़ातील त्यांची भूमिकाही गाजली. बॉम्बे गॅस पंपनीत ते नोकरी करीत असताना अचानक ती पंपनी बंद पडली. नाटकांचा ओढा त्यांना होताच. विद्याधर गोखले यांनी त्यांना नाटय़ समीक्षा लिहिण्यास भाग पाडले. एकाअर्थी ते ठीक झाले. कारण नाडकर्णींसारखे परखड समीक्षा करणारे व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीला मिळाले नसते. समीक्षा करता करता त्यांना नोकरीही त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातीलच मिळाली. त्या काळी ‘एक सो एक’ नाटकांची निर्मिती होतं होती आणि त्यावर त्यांची नाटय़ समीक्षा वाचण्यास मिळत गेली. ती वाचताना कळत नकळत संस्कार होत गेले. नाटक कसं आणि कशा दृष्टिकोनातून पाहायचं ते समजलं. शिबिरातून जे मिळणार नव्हतं ते नाडकर्णी यांच्या समीक्षेतून मिळालं. माझ्या मते ते आमचं विद्यापीठ होतं. आज जी काही नाटय़ समीक्षा करतोय, त्याचं व्रेडिट मी कमलाकर नाडकर्णी यांनाच देईन. त्यांची समीक्षा ही बोचरी असायची. नाटय़ प्रयोगाला नाडकर्णी आले की, कलाकार आणि निर्माता जरा हटकूनच असायचे. पुढच्या आठवडय़ात  त्यांची समीक्षा कशी असेल यावर ते चर्चा करीत असत. त्यांच्या काही समीक्षेमुळे निर्मात्यांना नाटक बंद करावंसुद्धा लागलेलं मी पाहिलंय. समीक्षा करण्यापूर्वी प्रयोगाच्या मध्यांतरात नाटकाची संहिता कधी पाठवाल? असा तगादा निर्मात्यांना चहा पिताना नेहमी असायचा. संहिता वाचून ते नाटय़ समीक्षा करायचे. समीक्षा वाचून प्रेक्षक 40 टक्के तरी प्रयोगाला येतात हे प्रत्येक निर्माता जाणून आहे.

कमलाकर नाडकर्णी यांचं प्रायोगिक रंगभूमीवर जास्त प्रेम. त्यामुळे प्रायोगिक नाटकांना ते व्यावसायिक नाटकांपेक्षा प्रथम प्राधान्य देत असतं. त्यामुळे त्या रंगभूमीवरील प्रत्येक नाटकाला प्रसिद्धीही मिळत गेली. त्या काळी प्रायोगिक नाटकांची निर्मिती होत असल्यामुळे प्रयोगांना प्रेक्षकांचा प्रतिसाद हा चांगलाच असायचा. मी अनेक वर्षांपासून पाहत आलोय ते हे की, एका गटाला ते फारच प्रसिद्ध देत. काहींची नाटपं चांगली असूनसुद्धा त्यांच्यावर बरीच टीका त्यांनी केली. व्यावसायिक रंगभूमीवरील काही नाटकांना आणि लेखकांना का त्यांनी त्यांच्या लेखणीने झोडपून काढले, हे कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे त्यांचा रोष त्यांनी पत्करला. त्यांच्या नाटकांच्या जाहिरातीत त्या त्या निर्मात्यांनी त्यांच्यावर टीकासुद्धा केलेली त्यांच्या जाहिरातीतून वाचलेली आहे, परंतु त्यांच्या आवडत्या गटांच्या नाटकांची तोंडभर स्तुती केल्याचंसुद्धा त्यांच्या समीक्षेतून वाचण्यात आलंय. असो, असं त्यांनी का केलं असेल ते तेचं जाणोत, पण अशामुळे काही लेखकांना त्यामुळे नैराश्य आलं. अशोक मुळ्ये यांनी त्यांची शिवाजी मंदिरात केलेली पंचाहत्तरी अजूनही आठवते. त्या वेळी मुळ्ये त्यांच्या मनोगतात गमतीने म्हणाले होते की, ‘‘तुम्हाला नाटय़ परिषद नाटय़ संमेलनाध्यक्ष कधीही करणार नाही. ही  साजरी केलेली पंचाहत्तरी तुम्ही नाटय़ संमेलनाध्यक्ष झाला आहात असे समजा.’’ त्या वेळी त्यांचं स्मितहास्य अजूनही आठवतंय.

कमलाकर नाडकर्णी हे व्यक्तिमत्त्व दिलदार आणि खळाळून हसणारं असंच होतं. अनेक वर्षे नाटकांच्या पत्रकार परिषदा माहीमच्या नीलम हॉटेलमध्ये होत असतं. त्याला ते जातीनं हजर असायचे. ते, ललिता बापट आणि त्यांचे पती, संजय डहाळे, रवींद्र पाथरे, जयंत पवार, श्रीराम खाडिलकर या पत्रकारांचा पत्रकार परिषदेत गप्पांचा फड बसायचा. गप्पा इतक्या रंगायच्या की, वेळेचं भान कुणालाही नसायचं. त्यात अनेक विषय चर्चिले जायचे. वादविवाद होताना मजा येत असे. तीच मजा नाटय़ संमेलनात यायची. निर्मात्यांच्या बसमधून महाराष्ट्रात होणाऱया नाटय़ संमेलनात जाताना त्यांची साथसंगत प्रत्येकाला हवीहवीशी वाटायची. तेच आमच्यातील ज्येष्ठ असल्यामुळे प्रत्येक जण त्यांची जातीनं काळजी घेत असत. त्या संमेलनातसुद्धा रात्री गप्पांचा फड बसायचा. आमचे मित्र रवींद्र खोत अनेक व्यक्तींच्या नकला करायचे. ती पाहताना नाडकर्णी यांचे खळखळून हसणं अजूनही डोळय़ांपुढून हलत नाही. परिसंवादात त्यांनी सुनावलेले नाटय़ परिषदेला बोचले असतील, पण ती खरी वस्तुस्थिती होती. नाटय़ परिषदेच्या कारभारावर खरपूस टीका करताना त्यांनी त्यांना चांगल्या गोष्टीसुद्धा दाखवल्या. 14 जून रोजी मोहन जोशी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष असताना नाटय़ परिषदेवर आलेल्या प्रायोगिक रंगभूमीवरील रंगकर्मींचा मोर्चा आणि त्यांचे आंदोलन आणि त्यात अग्रक्रमी असलेले नाडकर्णी अजूनही आठवतात. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेवर टीकात्मक लिहून आणि व्यक्त केलेले संमेलनातील भाष्य यामुळे नाटय़ परिषद त्यांच्यावर नाराज होती, पण जेव्हा नाटय़ परिषदेने त्यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर केल्यावर त्या सोहळय़ाला कमलाकर नाडकर्णी यांनी मांडलेले मनोगत सर्वकाही सांगून गेले. त्यांनी त्या वेळी नाटय़ परिषदेवर कटुता ठेवली नाही, यातूनच त्यांचं मोठेपण दिसून आलं.

आज ते नाहीत, पण त्यांनी लिहून ठेवलेला त्यांच्या विचारांचा, नाटय़ समीक्षेचा दस्तऐवज आजच्या तरुण पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरेल यात शंकाच नाही. नाडकर्णी यांच्या पुस्तकांच्या पानाचे पुस्तक जरी मिटले असले तरी ते त्यांच्या आठवणीने आपण कधीही उघडू शकतो. त्यातून आपणास ते रंगभूमीचा इतिहास उलगडून नक्कीच दाखवतील.

[email protected]