पारनेर, नगरमधील 30 बंधाऱ्यांची निविदा प्रक्रिया सुरू होणार, आमदार नीलेश लंके यांना आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पारनेर-नगर मतदारसंघातील 30 बंधाऱ्यांच्या कामांवरील स्थगिती उठविल्यानंतरही या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यात टाळाटाळ करणाऱ्या मृद व जलसंधारण विभागाच्या पुणे येथील कार्यालयासमोर आमदार नीलेश लंके यांनी सोमवारी उपोषण सुरू केले. या उपोषणाची दखल घेत सायंकाळी सर्व कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे लेखी आश्वासन अपर आयुक्त सुनील कुशेरे यांनी दिले.

पारनेर तालुक्यातील 21, तर नगर तालुक्यातील 9 बंधाऱ्यांच्या कामांना महाविकास आघाडीच्या काळात मान्यता देण्यात आली होती, मात्र या कामांना राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थगिती दिली होती. उच्च न्यायालयाने सुनावल्यानंतर इतर तालुक्यांच्या बंधाऱयांच्या कामांची स्थगितीही उठविण्यात आली होती, मात्र पारनेर तालुक्यातील कामांची निविदा प्रक्रिया रोखण्यात आली होती.

निविदा प्रकिया राबविली जात नसल्याने आमदार लंके यांनी आज पुण्यातील जलसंधारण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. दुपारी अपर आयुक्त सुनील कुशेरे यांनी लंके यांची भेट घेऊन निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी दर्शविली. मात्र, तत्काळ निविदा प्रक्रिया राबवा व तसे लेखी आश्वासन द्या, अशी भूमिका लंके यांनी घेतल्यानंतर सायंकाळी सुनील कुशेरे यांनी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आल्याचे व मंगळवारी हे ऑनलाइन टेंडर सार्वजनिक होतील असे आश्वासन दिले. त्यानंतर लंके यांनी उपोषण मागे घेतले.