1 एप्रिलपासून यूपीआय पेमेंटसाठी लागू होणार शुल्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाईन व्यवहारांसाठी सोपा पर्याय म्हणून यूपीआयचा वापर केला जातो. यूपीआयशी संबंधित अनेक अॅप्लिकेशन्सचा वापर करून ऑनलाईन व्यवहार केले जातात. पण, आता या व्यवहारांसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने एक परिपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. यूपीआयच्या माध्यमातून 2 हजार रुपयांवरील व्यवहार केल्यास त्यासाठी शुल्क आकारलं जाणार आहे. 1 एप्रिल 2023पासून यूपीआयशी संबंधित जीपे, फोनपे आणि पेटीएम इत्यादी अॅप्लिकेशन्सना हा नियम लागू होईल.

त्यानुसार, 2 हजार रुपयांवरील व्यवहारांना 1.1 टक्के इतकं शुल्क आकारलं जाणार आहे. या शुल्कातून संपूर्ण प्रक्रियेसाठी लागणारा खर्च वसूल करण्यात येणार आहे. टेलिकॉम आणि कृषी या दोन क्षेत्रांसाठी हे शुल्क कमी ठेवण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे.

एनपीसीआयने दिलेल्या माहितीनुसार,यूपीआयमधून होणारे 70 टक्के ऑनलाईन व्यवहार हे 2 हजार रुपयांच्या वर असतात. त्यामुळे हा शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात या शुल्कासंदर्भात सातत्याने चर्चा सुरू असून 30 एप्रिलपूर्वी त्याचं परीक्षण केलं जाणार आहे.

पण, हे शुल्क बँक अकाऊंट आणि पीपीआय वॉलेट दरम्यान होणाऱ्या पीअर टू पीअर आणि पीअर टू मर्चंट या व्यवहारांवर लागू असणार नाही. ही मोठ्या क्षेत्रात होणाऱ्या व्यवहारांवर लागू असेल, अशी माहिती मिळत आहे.