आव्हाड यांच्या माजी अंगरक्षकाची आत्महत्या, चौकशीच्या जाचाला कंटाळून जीवन संपवल्याची चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vaibhav-kadam

ठाणे पालिकेचे अभियंता अनंत करमुसे मारहाण प्रकरणात चौकशी सुरू असलेले पोलीस कर्मचारी वैभव कदम यांनी आज धावत्या लोकलसमोर झोकून देत आत्महत्या केली. कदम हे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा पथकातील माजी अंगरक्षक हेते.

घोडबंदर रोड येथील कावेसर परिसरात राहणारे अभियंता अनंत करमुसे यांनी तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा पह्टो अत्यंत गलिच्छ पद्धतीने मॉर्फ करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर 5 एप्रिल 2020 रोजी करमुसे यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आव्हाड यांच्या स्वीय सहाय्यकासह सहा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. यात पोलीस हवालदार वैभव कदम यांचाही समावेश होता. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. सध्या कदम हे मुंबई पोलीस दलात कार्यरत होते.

करमुसेंची याचिका स्वच्छ हेतूने केली नसल्याचे उच्च न्यायालयाचे निरीक्षण

करमुसे यांनी राज्य मानवाधिकार आयोगाकडेही दाद मागितली होती. त्यानुसार आमदार जितेंद्र आव्हाड, पोलीस कॉन्स्टेबल सागर मोरे, पोलीस नाईक सुरेश जनाठे आणि पोलीस हवालदार वैभव कदम यांना मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावून आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, करमुसे याने तपासकामात कोणत्याही प्रकारचे सहाय्य केले नसल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता. त्याने दाखल केलेली याचिकाही स्वच्छ हेतूने केली नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले होते, तर करमुसे याचे ट्विट व फेसबुक पोस्ट हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेबाहेर असल्याचेही उच्च न्यायालयाने नमूद केले होते.

सुसाईड नोट सापडली नाही

या घटनेनंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करून नव्याने तपास करण्यात यावा अशी याचिका अनंत करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यानंतर ही चौकशी पुन्हा सुरू करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून ठाणे गुन्हे शाखेकडून पोलीस हवालदार वैभव कदम यांची चौकशी केली जात होती. तळोजा येथे राहणारे कदम यांनी आज सकाळी 9वाजण्याच्या सुमारास तळोजा-निळजे स्थानकादरम्यान रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्याकडे कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही असे ठाणे रेल्वे पोलीस दलाचे वरिष्ठ निरीक्षक पंढरी कांदे यांनी सांगितले.
पोलीस आणि मीडियाला एकच सांगणे…

मी आरोपी नाही!

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन दिवस वैभव कदम यांची चौकशी केली. चौकशीच्या जाचामुळे ते तणावाखाली होते असे कदम यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. आत्महत्येनंतर कदम यांच्या व्हॉट्सअॅप डीपीवरील मेसेज व्हायरल झाले आहेत. त्यावर ‘‘साक्षी मला माफ कर, स्वर मला माफ कर, आई-पप्पा मला माफ करा, मी खरंच चांगला नवरा, बाप, मुलगा होऊ शकलो नाही. मी डिप्रेशनमुळे निर्णय घेत आहे. मला कुणालाही दोष द्यायचा नाही. पोलीस आणि मीडियाला माझी एकच विनंती आहे-मी आरोपी नाही.’’ अशा आशयाचे त्यांचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याची चर्चा सुरू आहे.