मुश्रीफ यांच्या मुलांच्या अटकपूर्व जामिनाची 3 एप्रिलला सुनावणी, कथित आर्थिक अफरातफर प्रकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सत्र न्यायालयात 3 एप्रिलला सलग सुनावणी होणार आहे. गुरुवारी विशेष पीएमएलए न्यायालयात मुश्रीफ यांचा कथित सीए महेश गुरवच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले. त्याची दखल घेत न्यायालयाने निकाल राखून ठेवला.

कोल्हापुरातील सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने चौकशी व छापेमारीचा धडाका लावला. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने सुरू असल्याचा दावा करीत हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांनी अटकपूर्व जामिनासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात धाव घेतली. तसेच मुश्रीफ यांचा कथित सीए महेश गुरव यानेही ऍड. प्रशांत पाटील यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन अर्ज केला. त्या अर्जांवर गुरुवारी सलग तिसऱया दिवशी न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यापुढे सुनावणी झाली. महेश गुरवतर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी जोरदार युक्तिवाद करून ईडीने केलेली कारवाई पूर्णपणे चुकीची असल्याचा दावा केला. ईडीकडून साखर कारखान्याशी संबंधित आर्थिक घडी विस्कळीत केली जात आहे. तपास यंत्रणेचे कर्तव्य सत्य उघड करणे आहे, निष्कारण त्रास देण्याचे नाही. सध्या केवळ राजकीय सूडबुद्धीने मुश्रीफ यांचे कुटुंबीय व महेश गुरवला नाहक अटकेची भीती घातली जात आहे. वास्तविक या प्रकरणात गुंतवणूकदारांचे तसेच कोल्हापूर जिल्हा बँक रेकॉर्डच्या कथित फेरफारबाबत बँकेतील कर्मचाऱयांचे जबाब नोंदवलेले नाहीत. कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत कुठलाही ठोस पुरावा हाती नसताना ईडी त्रास देत आहे, असे ऍड. देसाई यांनी सांगितले. त्यावर ईडीचे वकील सुनील घोन्साल्विस यांनी महेश गुरवच्या वकिलांच्या दाव्यांचे खंडन केले. दोन्ही बाजूकडील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश देशपांडे यांनी महेश गुरवच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला. तसेच मुश्रीफ यांच्या तीन मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 3 एप्रिलला सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले.