एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयाला उतरती कळा; विद्यार्थी संख्या घटली, अनेक अभ्यासक्रम बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील दीडशे वर्षे जुने एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाला उतरती कळा लागली आहे. शाळेचा बहुतांश भाग शासकीय तसेच अशासकीय आस्थापनांच्या कार्यालयीन कामांकरिता वापरला जात असून अनेक अभ्यासक्रम बंद झाल्याने विद्यार्थी संख्यादेखील घटली आहे. ही शाळा वाचविण्यासाठी आणि शाळेला गतवैभव मिळवून देण्यासाठी एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल माजी विद्यार्थी उत्कर्ष समितीने पुढाकार घेतला आहे.

शाळेच्या इमारतीमधील शासकीय कार्यालये अन्य ठिकाणी हलवावी आणि आगामी शैक्षणिक वर्षापासून पूर्णवेळ विविध तांत्रिक व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करावेत, अशी मागणी माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे केली आहे. माजी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने याविषयी मुख्याध्यापकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी दिलीप शिंदे, कीर्ती जाधव, संजय सावंत, गंगाराम मेडसरे, बाळकृष्ण नाणेकर, मिलिंद मिरजकर, राजू कांबळे, रमेश हंकारे, विनोद जठार, निशिकांत महांकाळ, सुभाष पावसे, ऍम्रोज सोज, प्रसाद आंबेरकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाने शाळेचा वापर शैक्षणिक कामासाठी व्हावा, यासाठी वरिष्ठ अधिकाऱयांना भेटण्याचा निर्णय घेतला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह प्रमोद नवलकर, छगन भुजबळ आणि इतर राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रांतील अनेक नामवंत व्यक्ती या शाळेत शिकून महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा समाजात उमटवला आहे. अशा नामवंत व्यक्ती घडवणारी संस्था अखेरच्या घटका मोजत असल्यामुळे या शाळेला गतवैभव मिळवून देण्यासाठी माजी विद्यार्थी संघटना एकवटली असून शाळा वाचविण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेटदेखील घेतली जाणार आहे.