जवळे येथील पठारे मळ्यात सशस्त्र दरोडा, महिलांना मारहाण करीत पाच लाखांचा ऐवज लांबवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पारनेर तालुक्यातील जवळे येथील पठारे मळ्यातील भवारी वस्तीवर दहा ते बारा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून पाच लाख रूपयांचा ऐवज लांबवला. चाकूचा धाक दाखवत घरातील दोन महिलांना चोरट्यांनी मारहाणही केली. पहाटे दीड ते तीन वाजेपर्यंत चोरट्यांचा रंजना शहाजी पठारे यांच्या घरात धुमाकूळ सुरू होता. दरम्यान याप्रकरणी पारनेर पोलीसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात दरोडयाचा गुन्हा दाखल केला आहे.

रंजना पठारे यांनी निघोज दूरक्षेत्रात यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी (दि.5) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घराशेजारील गोठ्यातील कुदळीच्या मदतीने पडीवीचा लोखंडी दरवाजा तोडला. त्यानंतर 10 ते 15 किलो वजनाचा दगड दरवाजावर मारून दरवाजा तोडला. दगड, जात्याच्या तळ्या घरात आणून त्यांनी सोफासेटवर दगड फेकून दहशत निर्माण केली. अंकिता पठारे यांना चाकूचा धाक दाखवला. रंजना पठारे यांना दरडावत सोने, रोख रक्कम काढून देण्याचे फर्मावले. दरम्यान दरोडेखोरांनी घरातील वस्तू अस्थाव्यस्त केल्या, उचकापाचक सुरू केली. त्याचबरोबर रंजना पठारे यांना मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील,हातातील, पायातील तसेच सून अंकिता यांच्या अंगावरील दागिने ओरबडले.

सासू व सुनेच्या अंगावरील दागिने काढून घेतल्यानंतर दरोडेखोरांनी कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कमही ताब्यात घेतली. दीड तासांच्या धुमाकुळानंतर चोरटे दोघींचे मोबाईल ताब्यात घेऊन पसार झाले. सोन्या, चांदीचे दागिणे, 25 हजार रूपये रोख, चार कोंबडया व एक कोंबडा असा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला. पारनेर पोलीसांना घटनेची माहीती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.श्‍वान पथक तसेच ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.