माटुंग्यात इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माटुंगा येथील 19 मजली इमारतीच्या पाण्याच्या टाकीचे काम सुरू असून दोन कामगार 30 फूट खाली गच्चीवर पडल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला. माटुंगा येथील तेलंग मार्गावर रुईया महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला शिव निर्मल ही 19 मजल्यांची इमारत आहे. त्या इमारतीच्या गच्चीवर पाण्याच्या टाकीचे काम सुरू असताना आज दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास राम सहाय तिवारी (52) आणि अरविंद मिराशी (45) हे दोघे कामगार पाण्याच्या टाकीवरून 30 फूट खाली गच्चीवर पडले. यात राम तिवारीचा मृत्यू झाला. तर अरविंद हा गंभीर जखमी झाला आहे. दोघेही वडाळा येथील राहणारे आहेत. याप्रकरणी माटुंगा पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करीत आहेत.