
>> गोरख तावरे
कराड शहरामधील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव गणपती तथा डी. जी. आण्णा पवार यांचे नुकतेच निधन झाले. लहानपणी खडतर परिस्थितीत आण्णांनी नाईट स्कूलच्या माध्यमातून बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शेतीत मन रमल्यामुळे त्यांनी सर्व वेळ शेतीसाठी देण्याचे ठरवले. सुधारित पध्दतीने शेती केली, त्यामध्ये त्यांना यशही आले. अर्थात शेतीबरोबरच समाजकार्याची आवड आण्णांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच त्यांनी आल्हाद गणेश मंडळ व शिवशक्ती गणेश मंडळाची स्थापना केली. त्यामाध्यमातून समाजहिताची कामे होऊ लागली. तद्नंतर स्टेडियमजवळच्या झोपडपट्टीतील मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या हेतूने त्या परिसरात नव्याने अंगणवाडी सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला.
कमळेश्वर देवस्थान ट्रस्टचे संचालक म्हणून काम पाहिले. पुढे स्व. यशवंतराव चव्हाण व पी.डी. पाटील यांचा परिसस्पर्श आण्णांना लाभला, तो त्यांच्या समाजकार्याच्या आवडीमुळेच. त्यातून कराड वि.का.स. सेवा सोसायचीचे चेअरमन म्हणून काम करण्याची संधी आण्णांना मिळाली. त्याचबरोबर पी. डी. पाटीलसाहेब यांनी स्थापन केलेल्या प्रीतिसंगम सहकारी पाणीपुरवठा संस्थेवर 1980 पासून चेअरमन म्हणून उल्लेखनीय काम केले. सदर कालावधीत आण्णांनी संस्थेची इमारत, शिवारात रस्ते, लाईट, गरजू शेतकऱयांसाठी चेंबरची सोय करून दिली. तसेच कराड रिमांड होममध्ये 1987 साली संचालक म्हणून कामास सुरुवात करून कार्याध्यक्ष म्हणून ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले. त्यांच्या कार्याध्यक्ष पदाच्या आजवरच्या कारकीर्दीत कराड रिमांड होममध्ये अनेक महत्त्वपूर्ण कामे आण्णांनी सहकाऱयांना सोबत घेऊन मार्गी लावली. शहरातील व तालुक्यांतील अनेकांनी मोठय़ा मनाने, सढळ हाताने रिमांड होमसाठी देणगी मिळवली. त्यातून विद्यार्थ्यांना एक आधार दिला आहे. आजपर्यंत देणगीमध्ये सातत्याने वाढच होत आहे.
अनेक सामाजिक कार्यक्रम, उपक्रम रिमांड होममध्ये राबविले जातात. रिमांड होम संस्थेला बिकट परिस्थितीतून बाहेर आणून संस्था आज राज्यात नामांकित वसतिगृह म्हणून ओळखली जाते. आण्णांच्या कार्याची अनेक सामाजिक संघटनांनी दखल घेतली. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय मानव अधिकार समितीच्या वतीने सन्मानित करण्यात आले. सन 2018-19 सालचा बाळसिध्द भूषण जीवन गौरव पुरस्कार आण्णांना खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांच्याहस्ते देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. डी.जी. आण्णा यांच्या निधनाने कराडचे एक समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.































































