
इंडीयन प्रिमिअर लीगमध्ये फिक्सिंग होतं का ? याबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. ज्या घटनेमुळे या चर्चेला उधाण आलं आहे ती चर्चा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाशी निगडीत असून या संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला एका व्यक्तीने फोन केला होता. आरसीबी संघाची आतील माहिती देण्यासाठी या व्यक्तीने सिराजला फोन केला होता. या माहितीच्या बदल्यात सिराजला पैशांचे आमीष दाखवण्यात आले होते. माहिती दिल्यास तुला तगडी रक्कम मिळेल असं फोन करणाऱ्याने सांगितलं होतं. सिराजने याबाबतची माहिती क्रिकेट नियामक मंडळाला दिली असून बीसीसीआयने भ्रष्टारचारविरोधी विभागाकडे ही माहिती सुपूर्द केली आहे.
माहिती मिळाल्यानंतर बीसीसीआयचा भ्रष्टाचार विरोधी विभाग तत्काळ सक्रिय झाला असून या विभागाने सिराजला फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध लावला आहे. सिराजला फोन करणारी व्यक्ती ही सट्टेबाज नसल्याचं कळाल्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. फोन करणारी व्यक्ती ही एक चालक असून तिला सट्टेबाजीत बरंच नुकसान झालं होतं. हे नुकसान भरून काढण्यासाठी ही व्यक्ती आतमी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होता. हा चालक हैदराबादचा रहिवासी असल्याचे कळाले आहे.


























































