पुढचा एक महिना मुंबईबाहेर जाऊन दाखवा! शीव–पनवेल मार्गाची दुरुस्ती; एकच मार्गिका सुरू राहणार…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलाबाळांच्या शाळा-कॉलेजना पडलेल्या उन्हाळी सुट्टय़ांमुळे बाहेरगावी जाण्याचे प्लॅनिंग तुम्ही करत असाल तर जरा सावधान.. कारण मुंबईच्या वेशीवरच तुमची कोंडी होण्याची शक्यता आहे. सायन-पनवेल मार्गावरील नेरुळ येथे सहा पदरी उड्डाणपुलाच्या दोन मार्गिका काँक्रीटीकरणाच्या कामामुळे उद्यापासून बंद राहणार आहेत. हे काम सुमारे एक महिनाभर चालणार असल्याने मुंबईतून बाहेर पडणारी वाहने तुफान वाहतूककोंडीत अडकणार आहेत. त्यामुळे मुंबईबाहेर पडताना मुंबईकरांच्या नाकीनऊ येणार आहेत.

सायन-पनवेल मार्गावर दररोज कोकण, गोवा, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, हैदराबाद, बंगळुरूकडे जाण्यासाठी दररोज लाखो वाहनांची वर्दळ असते. या महामार्गाचे संपूर्ण काँक्रीटीकरण झाले असले तरी काही पुलांवर मात्र डांबरीकरणच आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुलांवर खड्डे पडतात. त्यासाठी उड्डाणपुलांवरील काँक्रीटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने टप्प्याटप्प्याने सुरू केले आहे. नेरुळ येथील एलपी उड्डाणपुलावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका मार्गिकेचे काँक्रीटीकरण काही महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आले. आता पुण्याकडे जाणाऱया आणखी दोन मार्गिकांचे काँक्रीटीकरण उद्या रविवारपासून सुरू करण्यात येणार आहे. हे काम सुमारे महिनाभर चालेल. त्यामुळे या दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याने या भागात मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी होणार आहे. ही कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त तिरुपती काकडे यांनी केले आहे.

दुरुस्ती कसली?
सायन-पनवेल मार्गावर पावसाळ्यात एकही खड्डा पडत नाही. मात्र उड्डाणपुलावर रस्त्यांची चाळण होते. त्यामुळे मार्ग चांगला असून वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. ही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वच पुलांवर रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची मोहीम सुरू केली आहे. एलपी जंक्शनच्या उड्डाणपुलाच्या दोन मार्गिकांचे काँक्रीटीकरण उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे.

रंगीत तालीम यशस्वी
दोन मार्गिकांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वी आज वाहतूक पोलिसांनी त्याची रंगीत तालीम घेतली. पुलावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या. संपूर्ण वाहतूक पुलाच्या खाली असलेल्या मार्गिकांवरून आणि सर्व्हिस रोडवरून वळवण्यात आली. सायंकाळी गर्दीच्या वेळी पुन्हा पुण्याकडे जाणाऱ्या तिन्ही मार्गिका काही काळासाठी बंद करण्यात आल्या. संपूर्ण दिवसभर झालेल्या रंगीत तालीमचा आढावा घेऊन उद्यापासून तिन्ही मार्गिका बंद ठेवायच्या की एक मार्गिका सुरू ठेवायची याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे तुर्भे वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी सांगितले.

पर्याय कोणता?
एलपी जंक्शनच्या पुलावरील प्रवास टाळण्यासाठी हलक्या वाहनांना पामबीच मार्गाचा वापर करता येणार आहे. जड आणि अवजड वाहनांना तुर्भे जंक्शन येथून सर्व्हिस मार्गाने प्रवास करून उरण फाटा येथे पुन्हा सायन-पनवेल मार्गावर येता येणार आहे. शिळफाटा येथून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना महापे उड्डाणपुलाखालून एमआयडीसीमधील एचपी कंपनी मार्गाने थेट उरण फाटा येथे येता येणार आहे.

सुट्टीच्या काळातील हाल
परीक्षा संपल्या. उन्हाळ्याच्या सुट्टय़ा सुरू झाल्या. त्यामुळे पिकनिक किंवा गावाकडे जाण्यासाठी मुंबईकरांची जय्यत तयारी झाली आहे. त्यामुळे सायन-पनवेल मार्गावर गाडय़ांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. नेरुळ उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा फटका मुंबईकरांना बसून त्यांचे हाल होण्याची शक्यता आहे.