
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असतानाही आज रविवारच्या सुट्टीनिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे ‘लोकल’ हाल झाले. धीम्या मार्गावरील गाडय़ा जलद मार्गावर वळवल्याने अनेक गाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे लोकलच्या प्रतीक्षेत असलेले प्रवासी घामाच्या धारा आणि फलाटावरील लटपंतीमुळे चांगलेच हैराण झाले होते. तसेच विद्याविहार, कांजुरमार्ग, नाहूर या स्थानकांवर गाडय़ांना थांबा नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मध्य रेल्वेने सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 वाजेपर्यंतची माटुंगा-मुलुंडदरम्यानची धीम्या अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवल्याने सर्वच गाडय़ा 25 ते 30 मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे रखरखीत उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून अनेकांनी फलाटावरील पंख्याखाली आसरा घेतला होता. तसेच धीम्या आणि जलद गाडय़ांबाबत योग्य उद्घोषणा होत नसल्याने प्रवासी संताप व्यक्त करत होते.



























































