
अरमाकोच्या रिफायनरीविरुद्ध सध्या राजापूरमधील बारसू गावात आंदोलनाचा भडका उडाला आहे. प्राण गेले तरी बेहत्तर, कोकणची राखरांगोळी करणारा हा प्रकल्प होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत तब्बल 5 हजारांवर ग्रामस्थांनी प्रकल्पस्थळी ‘तंबू ठोकला’ आणि माती परीक्षणाला कडाडून विरोध केला. दरम्यान, पोलिसी बळाचा वापर करत ग्रामस्थांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर निशाणा साधला आहे.
”बारसू येथे सुरु असणारी खोके सरकारची दडपशाही अतिशय दुर्दैवी आहे आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र गायब आहेत. निसर्गसंपन्न कोकण जपणाऱ्या भूमिपुत्रांवर हे रावणराज्य चालवणारे सरकार पोलीसांकडून वार करण्यास मागे पुढे पाहणार नाही.” अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर निशाणा साधला.
यावेळी त्यांनी राज्य सरकारला जनतेसोबत जाहीर संवाद साधण्याचे देखील आवाहन केले आहे. ”आमची भूमिका स्पष्ट आहे.. पहिल्यांदा हा अत्याचार थांबवा! सर्व्हे थांबवा! स्थानिकांशी संवाद साधा! फायदा कुणाचा होणार आहे हे सांगा. वाद वाढवण्यापेक्षा जाहीर संवाद साधा. ज्याप्रमाणे मविआ सरकार ची अट होती की, प्रकल्प काय आहे हे जनतेला समजावून सांगावं, तसं एक जाहीर प्रेझेंटेशन द्यावं, पारदर्शकता ठेवावी आणि अंतिम मान्यता ही भूमिपुत्रांची असावी” असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.





























































