
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराबाबत राज्य सरकारने केलेला कायदा संविधानाला धरून नाही, तो घटनाविरोधी आहे. एका मंदिरासाठी कायदा करता येत नाही, याबाबतची जनहित याचिका माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर उद्या (दि. 28) सुनावणी होणार आहे.
डॉ. सुब्रमण्यम स्वामी 24 डिसेंबर 2023 रोजी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी महाराज मंडळी, स्थानिक नागरिक, भाविक यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. यानंतर विधिज्ञांशी चर्चा करून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. हिंदूंची मंदिरे ही सरकारमुक्त असावी, असा युक्तिवाद त्यांनी यापूर्वी तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश येथे न्यायालयात केला. या ठिकाणी न्यायालयाने सरकारचे नियंत्रण हटवले आहे. त्याच धर्तीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारीकरणातून मुक्त करावे, अशी याचिका डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी 8 मार्च 2023 रोजी दाखल केली होती. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती 1973चा कायदा हा बेकायदेशीर असून, घटनाविरोधी आहे. संविधानाला धरून हा कायदा नाही, असे म्हणणे डॉ. स्वामी यांनी या याचिकेत मांडले आहे.




























































