सुपाऱ्या घेऊन प्रकल्प लादू पाहताय, पण ते होऊ देणार नाही! उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जमीन आमची आणि इमले तुमचे… हे अजिबात चालणार नाही. बारसूमध्ये लोकांना चिरडण्यासाठी कुणाची सुपारी सरकारने घेतलीय? अशा सुपाऱ्या घेऊन प्रकल्प लादू पाहताय, ते होऊ देणार नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मिंधे सरकारला ठणकावून सांगितले. बारसू ही ग्रीन रिफायनरी आहे तर गावकऱ्यांना मारझोड कशाला करता? डोकी का फोडता? असा खणखणीत सवालही त्यांनी केला. बारसूत प्रकल्प नको ही स्थानिकांची भूमिका आहे आणि भूमिपुत्रांची भूमिका हीच शिवसेनेची भूमिका, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

   मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पावरून होत असलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले. जनतेच्या हिताचा प्रकल्प आहे असे मिंधे सरकार सांगतेय मग जोरजबरदस्ती का केली जात आहे? पोलिसी बळाचा वापर करून चांगले प्रकल्प का राबवत आहात? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

होय… मी पत्र दिले

होय, बारसूबाबतचे पत्र मी दिले होते, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प नको अशी आपली ठाम भूमिका आहे, परंतु त्यावेळी केंद्र सरकारकडून वारंवार विचारणा होत होती म्हणूनच बारसूचा अहवाल मागवून मी पत्र दिले होते, असा पलटवारही त्यांनी केला. जिथे स्वागत होत असेल तिथे प्रकल्प लावा असेही सांगितल्याचे ते म्हणाले. नाणार, बारसूबाबतची भूमिका आपली नाहीतर तेथील भूमिपुत्रांची आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

वेदांता तिकडे नेलात, विनाशकारी रिफायनरी इकडे पाठवता

पर्यावरणाचा ऱ्हास आणि लोकांचे नुकसान करून प्रकल्प आणू नका असे म्हटले की, विकासाच्या आड येतात असा आरोप होतो. मग वेदांता फॉक्सकॉन किंवा टाटा एअरबससारखे प्रकल्प इकडे का आणले नाहीत? जे चांगले प्रकल्प इकडे येऊ शकत होते, ते प्रकल्प तिकडे का पाठवले? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. मोठा प्रकल्प देऊ असे मोदी म्हणत होते तो हाच का विनाशकारी रिफायनरी प्रकल्प! अशी टीकी केली.

दलालांचा होकार आहे, ग्रामस्थांचा नाही

प्रकल्पाला अनेक ग्रामस्थांचे समर्थन असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे, पण ते समर्थन ग्रामस्थांचे नाही तर दलालांचे आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. प्रकल्पाला जमीन गेली की, मूळ मालकाला शासनाकडून त्याची भरपाई दिली जाते. बारसूमध्ये मूळ मालकांकडून जमिनी दलालांच्या ताब्यात गेल्या आहेत. त्यामुळे दलालांच्या होकाराला नागरिकांचा होकार समजू नका, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

उगीच मशाल घेतली नाही… अन्याय जाळून टाकायचाय

मिंधे सरकार संवेदनशील नाही. लोकांच्या भल्याचे त्यांना काहीही पडलेले नाही. पोलिसांकरवी अत्याचार सुरू आहे. महाराष्ट्रातील काम ‘गार’ करण्याचे या सरकारचे धोरण आहे, अशी टीका करतानाच, पक्षचिन्ह गेल्यावर उगीच मशाल घेतलेली नाही, समाजातला हा अन्याय जाळून टाकायचाय, असे उद्धव ठाकरे यांनी आवर्जून नमूद केले.

सरकार असंवेदनाशील

विविध प्रश्नी मोर्चे निघतात, परंतु सरकार संवेदनाशील असायला हवे. युतीचे सरकार असताना शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, मोर्चे येतील, परंतु मोर्चे आल्यावर ते पोलिसांकरवी अडवायचे नाहीत, ज्या खात्याबद्दल मोर्चा असेल त्या खात्याचा मंत्री मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून खाली उतरून मोर्चाला सामोरा जायला पाहिजे. ही संवेदनशीलता राहिली कुठे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

जोडे पुसायची लायकी नसणारे सरकार चालवताहेत!

आणखी एक प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याचे उदाहरणही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. ते म्हणाले की, ‘निरुद्योग’ मंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एक करार केला. 2 हजार 300 कोटी रुपयांचा. चपलांचे जोडे बनवणाऱ्या कंपनीबरोबर, पण ती कंपनी महाराष्ट्राऐवजी तामीळनाडूत गेली आणि मिंधे सरकार मात्र जोडे पुसत बसले. जोडे पुसायची लायकी असणारे सरकार चालवताहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. महाविकास आघाडी सरकारने 25 हून अधिक उद्योग आणि अडीच लाख कोटींहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. मात्र आता शेपटय़ा घालून बसणारे सरकार ते उद्योग बाहेर नेत आहेत. उद्योग शेजारच्या राज्यात असतानाही त्यांच्या शेपटय़ा बाहेर येत नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

राज्याच्या मुळावर येणारे प्रकल्प यापुढेही अडवणार

बारसूसाठी मी पत्र दिले होते तर अडीच वर्षांत पोलिसांच्या बळावर मी तो प्रकल्प का राबवला नाही? उद्धव ठाकरेंचे एवढे ऐकता तर मग गद्दारी करून सरकार का पाडले? आरेचा कारशेडचा निर्णय का फिरवला? कांजूरचा निर्णय का फिरवला? मी कोरोना सेंटर उभे केले ते नाही पाहिले, पण सरकार पाडून ते बुलेट ट्रेनवाल्यांच्या घशात घातलेत? रोज सकाळी उठून किती लोक बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाऊन परत येणार आहेत? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. राज्याच्या मुळावर येणारे प्रकल्प अडवले म्हणून महाविकास आघाडीचे सरकार पाडले गेले, पण लक्षात ठेवा, असे विषय यापुढेही अडवत राहणार, असेही उद्धव ठाकरे यांनी बजावले.

हिंमत असेल तर मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांसमोर जावे

बारसूमध्ये पोलिसांची मदत घेऊन माता-भगिनींना फरफटत नेताय. हिंमत असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांसमोर जाऊन त्यांचे गैरसमज दूर करून पारदर्शकता आणावी, असा खोचक सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला. मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात फिरतात, स्ट्रॉबेरी किती लावली आहे ते पाहतात. मग बारसूतील गावकऱ्यांसमोरही प्रकल्पाचे सादरीकरण करा. प्रकल्पाबाबतचे सत्य त्यांना समजलेच पाहिजे आणि ज्यांची जमीन जातेय त्यांना कंत्राटी नव्हे तर कायमस्वरूपीच रोजगार मिळायला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.