शिक्षक लाल रंगाचेच पेन का वापरतात? वाचा काय आहे कारण….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाळेत तुमच्या उत्तरपत्रिकेत मिळालेले लाल रंगाचे शेरे आठवताहेत? शून्य गुण मिळाल्यानंतर त्यांची लाल भोपळे मिळाले म्हणून खाल्लेला ओरडा आठवतो? ते लाल रंगाचे शेरे किंवा गुण आपल्यासाठी कधीकाळी खूप महत्त्वाचे होते. पण, तुम्ही विचार केला आहे का की शिक्षक लाल रंगाचेच पेन का वापरतात? किंवा विद्यार्थ्यांना काळ्या किंवा निळ्या रंगाच्या शाईचं पेन का दिलं जातं?

या मागे निश्चित असं कारण नाही. पण, रंगसंगतीचा विचार करता कागदावर गडद रंग सगळ्यात उत्तम उमटतो हे कारण असू शकतं. वही किंवा उत्तर पत्रिकेचा कागद हा पांढऱ्या रंगाचा असतो. त्यावर निळा किंवा काळा हे रंग स्वच्छपणे उमटतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची उत्तरं स्पष्टपणे दिसतात. शिक्षकांना ती उत्तरं तपासावी लागतात. त्यामुळे त्यांनी दिलेला शेरा हा निळ्या किंवा काळ्या रंगात दिला गेला तर तो विद्यार्थ्याच्या हस्ताक्षरात मिसळून वेगळा दिसणार नाही. त्यामुळे त्यांचा एक विरुद्ध रंग असलेला लाल रंग शिक्षक वापरतात.

तसंच, लाल रंग हा अधिकाराचं प्रतीक मानला जातो. लाल रंगात दिलेला शेरा लक्ष वेधून घेतो आणि त्यात सांगितलेली गोष्ट विद्यार्थ्यांच्या लक्षात राहते. त्यांच्या मनावर त्याचा थेट परिणाम मुलांच्या मनावर होतो. अर्थात यावरही परदेशात संशोधन झालं असून लाल रंगाचा नकारात्मक परिणाम मुलांच्या मनावर होत असल्याचं दिसून आल्याने अनेक शाळांमध्ये लाल रंगाच्या पेनावर बंदी आणण्यात आली आहे. प्राचीन कोरियन मान्यतेनुसार, लाल रंगाच्या शाईत ज्याचं नाव लिहिलं जातं, त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे कोरियन शिक्षक लाल रंगाचं पेन वापरत नाहीत.