
>> दिलीप देशपांडे
वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्ध पिंपळाच्या झाडाखाली ध्यानाला बसले होते. तेथे त्यांनी अखंड एकोणपन्नास दिवस तपश्चर्या केली. तेव्हा त्यांना साक्षात्कार झाला. त्यानंतर त्यांना महात्मा बुद्ध म्हटले जाऊ लागले. ज्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली ते झाड म्हणजे बोधिवृक्ष आणि त्या झाडाच्या आसपासचा परिसर म्हणजे बोधगया म्हणून ओळखला जाऊ लागला. बुद्ध पौर्णिमा साजरी करत असताना सगळय़ांनी महात्मा गौतम बुद्धांच्या या प्रेरणादायी विचारांचा अभ्यास व अनुकरण नक्कीच करायला हवे.
भगवान गौतम बुद्धांनी करुणा, सत्य, अहिंसेला आपल्या जीवनाचा आधार मानले आणि लोकांनाही याच मार्गावरून मार्गक्रमण करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यामुळे अनेकांनी आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. भगवान बुद्ध म्हणतात, मानवी जीवन हे दुःखमय आहे. दुःखाची निर्मिती तृष्णेतून होते. वासना, इच्छा, आवड, आसक्ती आणि म्हणून या तृष्णेवर नियंत्रण ठेवायला पाहिजे. मानवी व्यवहारांच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत. दुःख, तृष्णा, निरोध, प्रतिपद, दुःख निवारणासाठी सदाचाराचा मार्ग, अष्टांग मार्ग आहेत. या गोष्टीच्या पालनाने मानवाचे जीवन सुखमय होते.
कर्म, प्रेम, आनंद, शांतता याविषयी भगवान गौतम बुद्धाचे सुंदर आणि जीवन सुखी करणारे विचार आहेत.
कर्माविषयीचा विचार
– लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे तुमचे कर्म आहे. कोणाशीही वागताना चांगले वागा. चांगलेच फळ मिळेल.
– दयाळूपणा दाखवा, प्रेमाने वागा. तुमचा हेतू चांगला आहे का बघा. तपासून पहा. दुसऱयाला माफ करण्याची क्षमता ठेवा.
– तुमच्या बरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे कर्मच जबाबदार आहे. एक दिवस तुमच्या लक्षात येईल. कर्माची फळे तुम्हाला इथेच भोगावी लागतात.
– तुम्हाला नेहमी काय योग्य वाटते तेच बोला. कोणत्याही गोष्टीसाठी दुःख करून घेऊ नका.
– नेहमी चांगला विचार करा. दुसऱयाबरोबर चांगले वागा, चांगले बोला. परिणामी तुमचे चांगलेच होईल.
– आपण काय विचार करतो, त्याप्रमाणे माणूस म्हणून आपण जगतो. आपण आपल्या विचारांनीच मोठे होत असतो. आपल्या विचारांनीच जग बनते हे लक्षात ठेवा.
– कोणावर सूड उगवू नका. आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या. कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही.
आनंदासंबंधी विचार
– एखाद्याची प्रशंसा केल्याने दोघांचाही आनंद वाढेलच, पण तसे नाही केले तर तुम्हालाच अधिक दुःख मिळेल.
– आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही, तर आनंद हाच सुखी होण्याचा मार्ग आहे.
– दुसरे कोणीही तुम्हाला आनंदी वा दुःखी करू शकेल असा विचार करणेच हास्यास्पद आहे.
– तुम्ही कोण आहात वा तुमच्याकडे काय आहे, यावर आनंद अवलंबून नाही, तर तुम्ही नक्की काय विचार करता आणि कृती करता, यावर तुमचा आनंद अवलंबून आहे.
– शिस्तबद्ध मन हे नेहमी आनंददायी असतं.
– जेव्हा सर्व काही व्यवस्थित आहे हे तुम्ही जाणता, हाच खरा आनंद आहे.
– साठवण्यात, काही असण्यात आनंद नाही, तर असलेल्या गोष्टी वाटण्यात आनंद आहे.
– कोणत्याही गोष्टी वाटल्याने आनंद कमी होत नसतो, तर तो वाढतो.
– आनंद म्हणजे प्रवास आहे. प्रवासाचे शेवटचे ठिकाण नाही.
प्रेमाविषयी विचार
– ज्याचे हजारो माणसांवर प्रेम आहे, त्यालाच माणसं सोडून जाण्याचं, त्यांच्या नसण्याचं दुःख आहे, पण ज्याचे कोणावरच प्रेम नाही त्याला कोणताच त्रास नाही.
– जगात इतर कोणावरही अधिक प्रेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर प्रेम करण्यास पात्र आहात. स्वतःवर प्रेम करण्यास शिका.
– तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱयाला दुखवू शकत नाही. कारण तुम्हाला नक्की त्याचा काय त्रास असतो याची पुरेपूर कल्पना असते.
– प्रेमाचा मार्ग हा हृदयात असतो. तो इतर ठिकाणी शोधू नका.
– प्रेम म्हणजे एखाद्याच्या आंतरिक परमात्म्याची ओढ. हे दोन जीव एकत्र आले की, परिपूर्ण होतात. प्रेमाने जग जिंकता येते.
– कोणाचाही द्वेष करू नका. द्वेषाने आपलेच नुकसान होणार. त्यापेक्षा प्रेम करा. त्याने सर्व काही चांगलेच होईल.
शांततेच्या बाबतीत विचार
– चांगल्या शब्दाने मनाला शांतता मिळते. त्यामुळे नेहमी चांगलेच बोला.
– शांतता ही नेहमी मनातूनच येत असते. त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही.
– जे संतापजनक विचारापासून दूर राहतात त्यांना नेहमीच मानसिक शांतता मिळते. कारण त्यांचे मन शांत असते. मनात विचारांचे काहूर माजलेले नसते.
– नेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. हा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत रहा. म्हणजे तुमच्या मनाला शांती आणि आनंद दोन्हीही गोष्टी मिळतील.
– आपलं आयुष्य हे दुसऱयाच्या आयुष्याशी तुलना करीत राहिल्यास तुम्हाला मनःशांती कधीच मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे, त्यात आनंदाने रहा.
– एक क्षण एक दिवस बदलू शकतो. एक दिवस आयुष्य बदलू शकतो आणि एखाद्याचे आयुष्य हे संपूर्ण जग बदलू शकते.
वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्ध पिंपळाच्या झाडाखाली ध्यानाला बसले होते. तेथे त्यांनी अखंड एकोणपन्नास दिवस तपश्चर्या केली. तेव्हा त्यांना साक्षात्कार झाला. त्यानंतर त्यांना महात्मा बुद्ध म्हटले जाऊ लागले. ज्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली ते झाड म्हणजे बोधिवृक्ष आणि त्या झाडाच्या आसपासचा परिसर म्हणजे बोधगया म्हणून ओळखला जाऊ लागला. बुद्ध पौर्णिमा साजरी करत असताना सगळय़ांनी महात्मा गौतम बुद्धांच्या या प्रेरणादायी विचारांचा अभ्यास व अनुकरण नक्कीच करायला हवे.






























































