खड्डय़ात कार उलटून दीड महिन्याच्या बालकाचा मृत्यू; सहाजण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चालकाचा ताबा सुटल्याने कार खड्डय़ात उलटून दीड महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला असून, सहा प्रवासी जखमी झाले आहेत. पाथर्डी तालुक्यातील कल्याण-निर्मल (विशाखापट्टणम) राष्ट्रीय महामार्गावरील मानमोडी येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

अंकुश बाबूराव अडळकर (वय 45), सीताबाई अंकुश अडळकर (वय 42), गंगूबाई भुजंगराव देखमुख (वय 75), गंगूबाई बाबूराव अडळकर (वय 70), पल्लवी नवनाथ देशमुख (वय 14), रूपाली बालाजी देशमुख (वय 26, सर्व रा. पुणे) अशी जखमींची नावे आहेत.

पाथर्डीतून निर्मल- कल्याण (विशाखापट्टणम) या राष्ट्रीय महामार्गाने जाणारी इर्टिगा कार नगरच्या दिशेने जात होती. मानमोडी येथील धोकादायक वळणावर कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाच्या बाजूला असलेल्या खड्डय़ात जाऊन उलटली. अपघाताची माहिती मिळताच रस्त्याहून जाणाऱया नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दीड महिन्याच्या बालकावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्या बालकाचा मृत्यू झाला आहे.

अपघाताच्या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू आहे. मात्र, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सावधानगिरीचे फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या रस्त्यावरून येणाऱया भरधाव गाडय़ांना अचानकपणे पुढे पुलाचे काम सुरू असल्याचे लक्षात येऊन चालकाचा गोंधळ उडतो. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम चालू असलेल्या ठिकाणी सावधगिरीचे फलक लावणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.