
कराड शहरातील रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. या कामांच्या टेंडरमध्ये रस्त्यावरील कारपेटचा थर काढणाऱया मिलिंग मशिनचा वापर काही ठिकाणी आवश्यक करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मिलिंग मशिनने शिवाजी सोसायटीतील रस्त्यांवरील कारपेटचा थर काढण्यात आला होता. मात्र, मुख्य बाजारपेठेत दत्त चौक ते कृष्णा घाट या रस्त्याच्या कामासाठीही टेंडरमध्ये समावेश नसताना मिलिंग मशिनचा वापर करण्यात येत असून, याबाबत तक्रारी होऊ लागल्या आहेत. या मुद्यावरून शिंदे गटातच जुंपल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
दत्त चौक ते कृष्णा घाट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आहे. या कामाच्या टेंडरमध्ये मिलिंग मशिनचा समावेश नसतानाही येथे मिलिंग मशिनने रस्त्यावरील कारपेट काढण्यात येत आहे. दत्त चौक ते पाटण कॉलनीदरम्यान या मशिनने कारपेटचा थर काढण्यात आला आहे. कारपेटचा थर काढल्यानंतर उखडलेल्या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी या प्रभागाचे माजी नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर राजेंद्रसिंह यादव यांनी नगरपालिकेकडे तक्रार केली आहे.
बाजारपेठेतील रस्ता चांगला होता. तरीही या रस्त्यावर मिलिंग मशिनचा वापर टेंडरमध्ये नसताना का केला जात आहे, अशी भूमिका यादव व त्यांच्या समर्थकांनी घेतली आहे. शिवाजी हाऊसिंग सोसायटीत रस्ते उंच होते, तेथे या मशिनचा वापर आवश्यक आहे. मात्र बाजारपेठेत गरज नसताना मशिनचा वापर का केला जात आहे, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे समजते. या मशिनच्या वापराबाबत समर्थन आणि विरोध करणाऱया तक्रारी नगरपालिकेकडे झाल्या आहेत. त्यामुळे हे काम थांबविण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, मुख्य बाजारपेठेतील काम गतीने पूर्ण करण्याबाबत नगरपालिकेने ठेकेदारास सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, नगरपालिकेत रस्त्यांच्या कामात राजकीय हस्तक्षेप होत असून, नगरपालिकेतील बांधकाम विभागाच्या अभियंत्याचा चार्ज धायगुडे यांच्याकडून काढून घेऊन ए. आर. पवार यांच्याकडे व त्यांच्याकडून काढून मलकापूरच्या शशिकांत पवार या अधिकाऱयाकडे देण्यात आला आहे.
राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता
राजेंदसिंह यादव यांना मानणाऱया नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या नगरसेवकांना डावलण्यात आल्याचा सूर त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे. यातच राजेंद्रसिंह यादव यांचा मूळचा प्रभाग असणाऱया दत्त चौक, पाटण कॉलनी परिसरात मिलिंग मशिनच्या वापराबाबत स्थानिकांनी यादव यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर यादव यांनीही भूमिका घेत नगपालिकेकडे तक्रार केली आहे. त्यामुळे शिंदे गटातच जुंपल्याचे चित्र दिसत आहे. हा वाद न मिटल्यास याचे राजकीय पडसाद उमटतील, अशी चर्चा सुरू आहे.



























































