
अवलिया कलावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतोष पवार याचे ‘यदा कदाचित रिटर्न्स’ हे एक गाजलेले नाटक चार वर्षांपूर्वी हे नाटक रंगभूमीवर आले होते आणि त्यावेळी या नाटकाचे 174 प्रयोगही झाले होते, परंतु त्या नाटकाच्या निर्मात्यांचे अकस्मात निधन झाल्याने या नाटकाचे प्रयोग थांबले. त्यानंतर कोरोनाचा फटका रंगभूमीला बसला. त्यावेळी थांबलेले हे नाटक आता संतोष पवार पुन्हा एकदा रंगभूमीवर घेऊन येत आहेत. या नाटकाची दिमाखदार एन्ट्री नाटय़गृहांत होणार आहे.
नव्या दमाच्या तब्बल 13 कलावंतांसह स्वतः लेखक व दिग्दर्शक संतोष पवार या नाटकात भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे यात संतोष पवार विविध प्रकारची आठ पात्रे रंगवत आहे. ‘सोहम प्रॉडक्शन्स’ निर्मित व ‘भूमिका थिएटर्स’ प्रकाशित ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या नाटकाचा प्रयोग येत्या 12 मे रोजी दुपारी 4.30 वाजता विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ नाट्यगृहात होणार आहे.
याविषयी संतोष पवार म्हणाले, आम्ही आधी जेव्हा हे नाटक केले होते, तेव्हा काही गुणी कलाकार आम्ही शोधून आणले होते. आमचा तो प्रयोग त्यावेळी खूपच यशस्वी झाला होता. आताही आम्ही तशीच भट्टी जुळवून आणली आहे. फक्त आता फरक इतकाच की, त्यावेळी मी या नाटकात भूमिका करत नव्हतो; पण यावेळी मी यात पहिल्या प्रयोगापासून काम करत आहे.




























































