
उन्हाळी सुट्टी लागल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील लाखो चाकरमान्यांनी आपल्या कुटुंबकबिल्यासह गावची वाट धरली आहे. मात्र रेल्वे गाड्यांचे आरक्षणच मिळत नसल्याने त्यांची पावले नाइलाजास्तव खासगी बसकडे वळत आहेत. हाच डाव साधत खासगी बसचालकांनी प्रवाशांची लुटमार सुरू केली असून कोकणात जाण्यासाठी दीड-दोन हजार रुपये वसूल करत आहेत, तर सातारा, सांगली, कोल्हापूरला जाण्यासाठी एक हजार ते बाराशे रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत असल्याने प्रवाशांची लुटमार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
सध्या रेल्वेकडून कोकण मार्गावर अनेक विशेष गाडय़ा सोडल्या असल्या तरी त्याचे आरक्षण फुल्ल झाले आहे. तसेच विशेष गाडय़ा कोकणात पोहचण्याची वेळ आणि तेथून पुढे घरापर्यंत जाण्यासाठी असलेल्या स्थानिक वाहनांची वेळ जुळत नसल्याने प्रवाशांना घर गाठताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अनेकजण खासगी बस गाडय़ांना पसंती देत आहेत. त्याचा गैरफायदा बसचालक घेत असून प्रवाशांची अवाच्या सवा लूट सुरू आहे. दरम्यान, प्रवासी आपल्याला वर्षभर व्यवसाय देतात, त्यामुळे बसचालकांनी त्यांची लूट करू नये, परिवहन विभागाने ठरवून दिल्याप्रमाणेच भाडे आकारावे, असे आवाहन माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी केले आहे.
परिवहन विभागाकडून कारवाई नाही
एसटी भाडय़ाच्या दीडपटीपेक्षा अधिक खासगी ट्रव्हल्सचे भाडे नसावे. यापेक्षा अधिक भाडे आकारल्यास त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. खासगी बसच्या भाडय़ावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाची आहे. पण सध्या सुरू असलेल्या लुटीबाबत परिवहन विभागाकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. तक्रार आली तरच कारवाई करू, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने बसचालक मोकाट सुटले आहेत.


























































