
राजस्थानातील सत्ताधाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्षाला सुरुवात झाली असून तिथले माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत हे संघर्षाच्या केंद्रस्थानी आहेत. या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरूवात झाली असून यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मंगळवारी अशोक गहलोत यांच्यावर टीकास्त्र सोडलं. सचिन पायलट म्हणाले, ‘मी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे धौलपूरमधील भाषण ऐकले, ते ऐकून असे वाटले की त्यांच्या नेत्या सोनिया गांधी नसून वसुंधरा राजे आहेत.
सचिन पायलट म्हणाले, ‘एकीकडे आमचं सरकार पाडण्याचं काम भाजप करत असल्याचं बोललं जातंय, तर दुसरीकडे आम्हाला वाचवण्याचं काम वसुंधरा राजे करत असल्याचं बोललं जातंय.’ यात बराच विरोधाभास आहे. याबाबत नेमकी भूमिका काय आहे ती स्पष्ट व्हायला हवी. माजी उपमुख्यमंत्री पायलट यांनी म्हटले की, मला आता फार आशा वाटत नसून मी आता एक संघर्ष यात्रा काढणार आहे. पायलट हे 5 दिवसांची संघर्ष यात्रा काढणा असून त्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
2020 मध्ये झालेल्या बंडाळीचा संदर्भ देत सचिन पायलट म्हणाले, ‘आम्हाला सरकारमध्ये नेतृत्व बदल हवा होता. आम्ही आमचे मुद्दे पक्षप्रमुखांसमोर मांडले. अनेक बैठकांनंतर समिती स्थापन करण्यात आली. ज्यामध्ये पुढील दिशा निश्चित करण्यात आली. यानंतर काँग्रेसला मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत घेतली. हा कार्यकाळ अडीच वर्षे चालला, ज्यामध्ये आमच्याकडून शिस्तभंगाचे कोणतेही कृत्य झाले नाही. पायलट पुढे म्हणाले की, आमच्यावर आरोप करण्यात आले. आम्हाला आमच्या पक्षाची आणि सरकारची प्रतिमा खराब करायची नव्हती, पण ते स्वतःचेच सरकार आणि आमदारांना बदनाम करण्याचे काम करत आहेत. सचिन पायलट म्हणाले, ‘आम्हाला आमच्या पक्षाचे नुकसान करायचे नव्हते, पण आमच्याच आमदारांची आणि नेत्यांची बदनामी करणे आणि भाजपचे गुणगान करणे हा काय प्रकार आहे हे माझ्या समजण्यापलीकडे आहे.




























































