आंबेत पुलाचे बांधकाम करण्यास अपयश; सत्ताधाऱ्यांच्या कोकण विकासाच्या नुसत्याच गप्पा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 12 कोटी रूपये खर्च करून आंबेत पूल अवघ्या आठच महिण्यात पुन्हा दुरूस्तीस आल्याने पुन्हा दुरूस्तीसाठी 10 कोटी रूपये मंजूर करावे लागले. तरीसुध्दा गेल्या 3 वर्षात पूलाची दुरूस्ती काही पूर्ण होईना म्हणून फेरी बोटीतून एस.टी. बसची वाहतुक करण्याची नामुश्की प्रशासनावर आली. त्यामुळे कोकण विकासाच्या जाहीरातींवर सरकारी तिजोरीतून उधळपट्टी करून विकासाच्या गप्पांचा केवळ आभास निर्माण करणाऱ्या सरकारचे हे खरे अपयश आहे.

रत्नागिरी जिल्हयातील मंडणगड तालूक्यातील म्हाप्रल आणि रायगड जिल्हयातील म्हसळा तालूक्यातील आंबेत या दोन गावांना जोडणा-या सावित्री खाडीवरील आंबेत पूलाच्या दुरूस्तीच्या कामामुळे आंबेत पूलावरून वाहतुक थांबल्याने या खाडीत दळणवळासाठी फेरीबोट ठेवण्यात आली आहे. सुरूवातीला वाहनासाठी भाडे आकारले जायचे त्यानंतर मोफत सेवा देण्याचे ठरले. गेल्या पाच दिवसापासून या फेरीबोटीतून एस.टी.बस सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र न जाणो काही दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण एस.टी.महामंडळ, फेरीबोट चालक, मेरी टाईम बोर्ड जबादारी कोणाची हा प्रश्न अनुत्तरीय आहे. फेरी बोटीतून प्रवास करणा-यांना लाईफ जॅकेट उपलब्ध नाहीत. ना जीवरक्षकांची केली आहे नेमणुक. त्यामुळे फेरी बोटीतून एस.टी.बसची वाहतुक ही धोक्याचीच आहे.

रत्नागिरी रायगड जिल्हयात जयगड तवसाळ , वेसवी बागमांडले, दाभोळ धोपावे, फरारे परचुरी, दिघी आगरदांडा अशा फेरी बोटी सुरू आहेत मात्र त्या ठिकाणच्या फेरी बोटीतून एस.टी बस नेण्यास परवानगी नाही. अपवाद फक्त म्हाप्रल आंबेत फेरी बोटीचा आहे. म्हाप्रल आंबेत फेरी बोटीतून मंडणगड आगारातील साध्या प्रकारातील 13 एस.टी बसेस फेरी बोटीतून नेण्यात येतात त्यातील 6 बस या फक्त जाताना नेण्यात येतात तर दापोली आगारातून 1 शयनयान आसनी 1 निमआराम आणि 6 साध्या प्रकारच्या अशा एकुण 8 एस.टी बस नेण्यात येत आहेत. जेव्हा एखादया मार्गावर एस.टी.बस सेवा सुरू केली जाते तेव्हा त्या मार्गाची पाहणी केली जाते.त्यानंतर सबंधित यंत्रणेकडून दाखला दिल्यानंतरच एस.टी. सेवा सुरू करण्यात येते. असे असताना नेमकी या मार्गाची पाहणी कोणी केली दाखला कोणी दिला तेव्हा फेरी बोटीतून एस.टी. सेवा सुरू करण्यात आली. की अधिका-यांवर कोणाचा राजकिय दबाब होता हे जबाबदारी टाळण्या आधीच तपासणे गरजेचे आहे.

फेरी बोटीतून एस.टी.वाहतुक करणे याला कोणाचा विरोध नसला तरी प्रवाशांच्या सुरक्षेच काय हा प्रश्न महत्वाचा आहे. केवळ पुलाच्या दुरूस्तीच्या रखडलेल्या कामामुळे जर फेरी बोटीचा पर्याय असेल आणि फेरी बोटीतून एस.टी वाहतुक सुरक्षिततेची वाटत असेल तर मग अन्य ठिकाणच्या फेरी बोटीतूनही एस.टी.बस वाहतुक सुरू करण्यास हरकत नाही. त्याने प्रवाशांच्या वेळेचा आणि एस.टी बसेसच्या इंधनाचा अपव्यय टळेल. फेरी बोटीतून एस.टी.बस सेवा सुरू केल्याने फेरी बोट ही दिवसरात्र सुरू असायला हवी मात्र तशी प्रशासनाकडून काळजी घेण्यात आली नाही.