
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. ‘ईडी’ सरकारला वर्ष पूर्ण होत आले तरी मंत्रिमंडळ विस्तार होऊ न शकल्यानं भाजप आणि मिंधे गटातील आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यापार्श्वभूमीवर ही तिन्ही नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जात होती. मात्र या भेटीतून मिंधे गटाच्या हाती काही पडण्याऐवजी हातात असलेलं देखील निसटण्याचीच शक्यता असल्याची माहिती कळते आहे. इंडिया टुडेनं या भेटीसंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ज्यामध्ये शिंदे-फडणवीसांना एकमेकांना समन्वयानं काम करण्यास सांगण्यात आलं असून कार्यकर्त्यांमध्ये देखील निराशा झटकून आणि एकमेकांविषयी असलेला विरोध संपवून बुथ स्तरापर्यंत एकत्र काम करण्यासाठी सांगण्यात आलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर देखील मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यानं भाजप आणि मिंधे गटातील आमदार नाराज आहेत. अशातच भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी मिंधे गटाच्या नेत्यांच्या जागांवर कुरघोडी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मिंधेंच्या गोटात आणखी नाराजी पसरली आहे. ती दूर करण्याच्या दृष्टीने दोन्ही नेते दिल्लीत अमित शहांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं वृत्त होतं.
या भेटी दरम्यान अमित शहा यांनी दोन्ही नेत्यांना कार्यकर्त्यांमध्ये बूथ स्तरापर्यंत समन्वय ठेवण्यास सांगितलं आहे. मिंधे गट आणि भाजपने कार्यकर्त्यांमधील वाद सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी. तसेच महाविकास आघाडीप्रमाणे, या महिन्याच्या अखेरीपासून संयुक्त सभा घेण्यास सुरुवात करण्यास देखील सांगितल्याचं वृत्त आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. लोकसभेच्या जागांच्या संख्येनुसार उत्तर प्रदेशनंतर दुसऱ्या क्रमांकावरील राज्य आहे. त्यामुळे भाजप आपली ताकद महाराष्ट्रात वापरत आहे. अधिकाधिक जागांवर भाजपच्याच उमेदवारांना लढावावं असा भाजपचा प्रयत्न असून या विचारानं मिंधे गटात नाराजीचं वातावरण आहे. मिंधे गटाच्या खासदारांच्या असलेल्या जागांवर स्थानिक भाजपने आता आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबतच मिंधे गटाच्या नेत्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या जांगाचे काय असा प्रश्न समोर मांडला असता अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं की, ‘ज्या जागांवर दोन्ही पक्षांचे खासदार आहेत, त्या जागा तूर्त तरी लढवाव्यात. मात्र अन्य जागा विशेषत: ज्या जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षाकडे आहेत त्या जागांबद्दल सध्या काहीच बोलू नये. त्या जागांवर सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर आणि डेटा समोर आल्यानंतरच निर्णय घेऊ’, अशी माहिती देण्यात आली आहे.
एका बाजूला हाती असलेल्या जागांवर भाजपच्या नेत्यांकडून सुरू असलेली आक्रमक तयारी आणि दुसऱ्या बाजूला उरलेल्या जागांवर सर्वेक्षण आणि डेटा आल्यानंतर मिळणारा निर्णय यामुळे मिंधे गटाच्या हाती काही पडण्याऐवजी हातात असलेलं देखील निसटण्याचीच शक्यता अधिक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर मंत्रिमंडळ विस्ताराचीही काही लक्षणं दिसत नसल्यानं मिंधे गटात नाराजी कायम असल्याचं बोललं जात आहे.

























































