
क्रिकेट विश्वातील दोन बलाढ्य संघ अर्थातच हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया आपल्या पहिल्या वहिल्या कसोटी अजिंक्यपदासाठी (डब्ल्यूटीसी) एकमेकांशी दोन हात करणार आहेत. दोन्ही संघांनी आयसीसीच्या एकदिवसीय विश्वचषक, टी 20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या तिन्ही स्पर्धा जिंकल्यात. फक्त जेतेपदाची चौकट पूर्ण करण्यासाठी त्यात जागतिक कसोटी अजिंक्यपदाची कमतरता आहे. आयसीसीच्या जगज्जेतेपदाची ती चौकट पूर्ण करण्यासाठी दोन्ही संघ पूर्ण ताकदीनिशी सज्ज असले तरी जगज्जेतेपदासाठी कसोटी लागणार हे निश्चित आहे.
आयसीसीची सर्वाधिक जेतेपदे ऑस्ट्रेलियाने जिंकलीत. पुरूष, महिला आणि युवा या तिन्ही गटाची जेतेपदे त्यांच्याकडे आहेत, फक्त नव्याने सुरू झालेले कसोटीचे जगज्जेतेपद ऑस्ट्रेलियाला अद्याप जिंकता आलेले नाही. तर हिंदुस्थान गेल्यावेळी कसोटी अजिंक्यपदाच्या लढाईत उतरला खरा पण न लढताच हरला होता. न्यूझीलंडने हे जगज्जेतेपद ८ विकेट राखून सहज जिंकले होते. हिंदुस्थान सलग दुसर्यांदा कसोटी जगज्जेतेपदाची लढत खेळतोय आणि ते अपयश त्याच मैदानावर धुवून काढण्यासाठी आपले सर्वस्वपणाला लावणार आहे.
कांटे की टक्कर
कसोटीची आकडेवारी पाहिली तर ऑस्ट्रेलियाचे पारडे निश्चितच जड आहे, पण गेल्या दोन वर्षांची कामगिरी पाहता हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कामगिरी तोडीस तोड आहे. त्यातच उभय संघ गावस्कर-बॉर्डर करंडकात भिडले आणि ज्यात हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियावर मालिकाविजय मिळविला होता. ही कामगिरी पाहाता हिंदुस्थानला ऑस्ट्रेलियापेक्षा काकणभर सरसच म्हणावे लागेल.
रोहित फिट
सरावादरम्यान रोहित शर्माच्या अंगठ्याला बॅण्डेज पाहून त्याला दुखापत झाल्याचे समोर आले. मात्र ही दुखापत सामान्य असून तो जगज्जेतेपदासाठी तयार आहे. हिंदुस्थानच्या सर्वच खेळाडूंनी गेले तीन दिवस कसून सराव केला आहे आणि आता ते लढाईच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झालेत.
हिंदुस्थानला जगज्जेता बनवायचेय
मला हिंदुस्थानला कसोटी क्रिकेटचे जगज्जेतेपद जिंकून द्यायचेय. प्रत्येक खेळाडू त्याचसाठी खेळतो. हिंदुस्थानी संघाचा कर्णधार म्हणून मला एक-दोन आयसीसी करंडक जिंकण्याची इच्छा आहे. हिंदुस्थानचा संघ गेले दहा वर्षे एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेला नाही. हा दुष्काळही मला संपवायचे असल्याचे रोहित शर्मा म्हणाला.
अश्विनबाबत अनिश्चितता
ओव्हलची खेळपट्टी पाहूनच फिरकीवीर दोन खेळवायचे की एक हे ठरवले जाणार आहे. संघात रवींद्र जाडेजाचे स्थान पक्के आहे. अश्विनची निवड परिस्थिती पाहिल्यानंतरच केली जाऊ शकते. शर्माच्या या संकेतामुळे अश्विन अंतिम अकरा असेल की नाही ते उद्याच कळू शकेल. एका फिरकीसह हिंदुस्थान मैदानात उतरला तर शमी आणि सिराजच्या जोडीला ठाकूर आणि यादवला संधी मिळू शकते. तसेच यष्टिरक्षक म्हणून भरतचे नाव सध्या निश्चित मानले जात आहे.
हिंदुस्थान जिंकणार
कसोटीचे अजिंक्यपद कोण जिंकणार, हे अनिश्चित असले तरी क्रिकेटचे दिग्गज आपापले अंदाज बांधू लागले आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने हिंदुस्थान जिंकणार, अशी भविष्यवाणी केली आहे. हिंदुस्थानच्या जडेजा-अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या नाकात दम आणले होते. त्यामुळे इंग्लिश वातावरणातही हिंदुस्थान दोन स्पिनर आणि दोन वेगवान गोलंदाजांसह उतरेल आणि शार्दुल तिसरा वेगवान गोलंदाज असेल, असेही हुसेन म्हणाला.
ऑस्ट्रेलिया एका फिरकीवीरासह
ऑस्ट्रेलियाचा संघ जवळजवळ निश्चित असून ते चार वेगवान आणि एका फिरकीवीर गोलंदाजासह खेळतील. त्यांनी नॅथन लायनवर आपला पूर्ण विश्वास दाखवला असून गरज भासल्यास मार्नस लाबुशेन आणि स्टीव्हन स्मिथच्या हातात चेंडू देतील. कर्णधार पॅट कमिन्स, स्कॉट बोलंड आणि मिचेल स्टार्क प्रमुख मारा सांभाळतील तर ग्रीन त्यांच्या जोडीला आहेत. सलामीला डेव्हिड वॉर्नरसह उस्मान ख्वाजाच उतरणार हेसुद्धा स्पष्ट आहे. त्यामुळे उद्या ओव्हलवर ऑस्ट्रेलियन संघात बदल झाला तर सर्वांना निश्चितच आश्चर्य वाटू शकते.
दोन्ही संघांत साम्य
2021 साली झालेल्या कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीत आणि आता खेळणार्या संघात खूप साम्य आहे. सध्या संघात असलेल्या पैकी केवळ ऋषभ पंत, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे तिघेच नाहीत. बाकी सर्व संघ सारखाच आहे. रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे पाचही आघाडीवीर ओव्हलवरही खेळणार आहेत. तसेच जडेजा, अश्विन आणि शमी या तिघांनी गेल्यावेळी गोलंदाजीची धुरा सांभाळली होती. ते आताही आहेत.
हिंदुस्थानचा संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जाडेजा, केएस भरत /इशान किशन, रवीचंद्रन अश्विन/शार्दुल ठाकुर, उमेश यादव/जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ
डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमरून ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलंड




























































