
>> डॉ. शैलेंद्र देवळाणकर
1971 मध्ये झालेली पाकिस्तानची फाळणी ही त्यांच्या लष्करामुळेच झाली, असा घणाघाती आरोप पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, आज तशीच परिस्थिती दिसत असल्याचे सांगून पाकिस्तान पुन्हा एकदा फुटू शकतो, असे सूतोवाचही केले. सध्याच्या परिस्थितीचा साकल्याने वेध घेतल्यास पाकिस्तानातील परिस्थिती महाभयंकर स्थितीला जाऊन ठेपली असून या अस्थिरतेचा फायदा तेथील कट्टरतावादी घेण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानमध्ये अत्यंत नाटय़मय अशा स्वरूपाच्या राजकीय घटना- घडामोडी गेल्या काही दिवसांमध्ये घडताना दिसत आहेत. अर्थात यामध्ये नावीन्य असे काही नाही. कारण सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या की, अशा स्वरूपाच्या नाटय़मय घडामोडी तिथे घडतच असतात हा इतिहास आहे. पाच वर्षांपूर्वीचा काळ पाहिल्यास सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी नवाझ शरीफ यांना तेथील न्यायालयाकडून शिक्षा सुनावली जाणे, अटक होणे यासंबंधातील नाटय़ रंगले होते. यंदा साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांपूर्वी पाकिस्तानचे माजी पदभ्रष्ट पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणावरून अटक करण्यात आली. या अटकेनंतर संपूर्ण पाकिस्तानात आक्रोश आणि असंतोषाचा आगडोंबही उसळलेला दिसून आला. तथापि, त्यानंतर त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आणि त्यांची सुटका झाली.
पाकिस्तानात तीन प्रमुख सत्तापेंद्रे असून त्यांच्यामधील राजकीय सुंदोपसुंदीची ही सर्व फलश्रुती आहे. या तीन सत्तापेंद्रांमध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ, इम्रान खान आणि पाकिस्तानचे लष्कर यांचा समावेश आहे. या तिघांमधील रस्सीखेच कमालीची वाढली आहे. ‘द डॉन’ या पाकिस्तानातील प्रमुख वृत्तपत्राने अलीकडेच आपल्या अग्रलेखामध्ये असे म्हटले आहे की, पाकिस्तान हा यादवी युद्धाच्या उंबरठय़ावर येऊन ठेपलेला आहे. पाकिस्तानातील संघर्षमय स्थिती इतकी स्पह्टक बनली आहे की, त्यामुळे हा देश फुटीच्या मार्गावर आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तानला उद्देशून एक भाषण केले असून ते सर्वांचे लक्ष आकर्षित करणारे ठरले. या भाषणामधून त्यांनी थेट लष्कराला इशारा दिला आहे.
आजघडीला इम्रान खान यांना सबंध पाकिस्तानातून मिळणारे समर्थन प्रचंड मोठे असून त्यात वाढच होत चालली आहे. किंबहुना, इतकी लोकप्रियता असणारा नेता पाकिस्तानला आजवर कधीच मिळालेला दिसला नाही. मुळात, पाकिस्तानात शरीफ घराणे, भुत्तो घराणे यांसारख्या घराणेशाहीचाच पगडा सर्वोच्च पदावर राहिला आहे. तथापि, इम्रान खान हा सर्वसामान्यांचा नेता म्हणून पुढे आला आणि लोकसमर्थनामुळेच सत्तेतील प्रमुख पदावर विराजमान झाला. लष्कराने टाकलेल्या डावपेचांनंतर इम्रान यांची या पदावरून गच्छंती करण्यात आली तेव्हा पाकिस्तानात मोठा जनक्षोभ उसळला होता. काही दिवसांपूर्वी त्याला अटक झाल्यानंतर संतापलेल्या लोकांनी पाकिस्तानी लष्कराच्या दरवाजावर, पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाच्या दरवाजावर मोठय़ा प्रमाणावर आंदोलने केली.
1977 मध्ये अशाच प्रकारची लोकप्रियता लाभलेले झुल्फिकार अली भुत्तो हे पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यांच्यामध्ये आणि तत्कालीन लष्करप्रमुख झिया उल हक यांच्यामध्येही अशाच प्रकारचा संघर्ष झाला होता. त्या संघर्षामध्ये झुल्फिकार अली भुत्तो यांना माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर 1999 मध्ये तर फार विचित्र प्रकार घडला होता. हिंदुस्थानबरोबरचे कारगील युद्ध हे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी घडवून आणल्याचे सिद्ध झाले होते. त्यानंतर मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला. शरीफ यांना श्रीलंकेतील एका बैठकीला पाकिस्तानचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्यासाठी मुशर्रफ यांनी पाठवले होते. या बैठकीला जाण्यासाठी शरीफ जेव्हा विमानात बसले तेव्हा इकडे मुशर्रफ यांना बरखास्त करून टाकले. ही बातमी कळताच त्याच विमानाने शरीफ पुन्हा परत आले, पण त्यांचे विमान पाकिस्तानात लँड होऊ दिले नाही. यावरून पाकिस्तानचे राजकीय नेतृत्व आणि लष्कर यांच्यात प्रचंड संघर्ष झाला. अखेरीस ते विमान लँड होऊ दिले, पण मुशर्रफ यांनी शरीफ यांना हटवून लष्करी राजवट प्रस्थापित केली.
इस्लामिक राष्ट्रांची लोकशाहीची मानसिकताच मुळी वेगळी आहे. त्यांच्या दृष्टीने लोकशाही म्हणजे इस्लामीकरण. त्यामुळेच मागील काळात अरब स्प्रिंगसारखी चळवळ यशस्वी होऊ शकली नाही. आताही पाकिस्तानची वाटचाल कट्टर इस्लामीकरणाकडे होऊ शकते. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील उत्तर वझिरीस्तान भागात ‘तहरीक- ए-तालिबान पाकिस्तान’ या दहशतवादी संघटनेने मध्यंतरीच्या काळात इस्लामवर आधारित शरीयत सरकार लागू करून पाकिस्तानातच एक वेगळे राष्ट्र तयार केल्याची घोषणा केली आहे. मध्यंतरी या संघटनेने पाकिस्तानात भीषण दहशतवादी हल्ले घडवून आणले होते. दुसरीकडे, बलुचिस्तानातील लोकांचा स्वातंत्र्याचा लढा आजही कायम आहे आणि ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’शी या बलुचींनी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे सध्याच्या संघर्षानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत हे दोन प्रांत पाकिस्तानातून वेगळे होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. थोडक्यात पाकिस्तानला येत्या काळात विभाजनाला नव्हे, त्रिभाजनाला सामोरे जावे लागू शकते, अशी स्थिती आहे. हिंदुस्थानच्या दृष्टीने अस्थिर पाकिस्तान हा चिंतेचा विषय राहिला आहे. कारण या अस्थिरतेवरून लक्ष वळवण्यासाठी लष्करे तोयबा, जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटना सीमेवर सक्रिय होताना दिसतात. त्यामुळे हिंदुस्थानी लष्कराला येत्या काळात अधिक सजग राहणे गरजेचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, 1971 मध्ये पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा प्रचंड निर्वासितांचे लोंढे हिंदुस्थानात आले होते. आता त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातूनही हिंदुस्थानला सावध रहावे लागेल. एपंदरीत, येणारे काही दिवस हे पाकिस्तानसाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहेत. या आव्हानांचा सामना करताना हा देश एकसंध राहतो की विभागला जातो हे पाहणे रंजक ठरणार आहे.
(लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत.)































































