वारसा स्त्री सन्मानाचा – भांडुपच्या मनस्विनी महिला, मंडळाची यशस्वी वाटचाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अनघा सावंत

मनस्विनी महिला मंडळ हे खरे तर चार दशकांचा वारसा असलेल्या वनिता मोरेश्वर कृपा महिला मंडळाचे नवे रूप. कोरोना काळात स्थगित झालेल्या वनिता मोरेश्वर कृपा महिला मंडळालाच जानेवारी 2023 मध्ये नवसंजीवनी देऊन जुन्या काही मैत्रिणींच्या विचारातून ‘मनस्विनी महिला मंडळा’ची स्थापना करण्यात आली. 41 वर्षांची दीर्घ कारकीर्द असलेल्या जुन्या मंडळाचा वारसा निग्रहाने पुढे नेत मनस्विनी महिला मंडळ नवीन घोडदौड करण्यास सज्ज झाले आहे.

साधारण 1982 सालाच्या दरम्यान दातार कॉलनी, भांडुप (पूर्व) येथील काही हौशी समविचारी मैत्रिणींनी एकत्र येऊन वनिता मोरेश्वर कृपा महिला मंडळाची स्थापना केली. सुरुवातीला चार-पाच मैत्रिणींनी एकजुटीने प्रत्येकीच्या घरी एकत्र येत ही शृंखला जवळपास दीडशे सभासद मैत्रिणींपर्यंत नेली. मंडळाच्या स्थापनेत सिंहाचा वाटा उचलणारी धडाडीची, बुद्धिमान अशी काही व्यक्तिमत्त्वं हळूहळू काळाच्या आड लुप्त होत गेली तरी मंडळाचा वारसा अनेकांनी पुढे चालू ठेवला.

सभासद महिलांनी एकत्र येणे, कलागुण जोपासणे, संस्कृती-परंपरांचा वारसा जतन करणे, पुढच्या पिढीस सदैव मार्गदर्शन करणे, पौराणिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक जडणघडण आणि मनोरंजन यांनी समृद्ध असलेले हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे जुन्या मंडळापासून चालत आलेले उपक्रम पुढेही कायम चालू राहतील, असे मनस्विनीच्या सचिव लीना भोसले यांनी सांगितले.

मंडळ उत्तम उपक्रम राबवीत असून या वर्षी मंडळाच्या हळदीपुंकू समारंभात ‘विचारांचे धन’ वाण म्हणून देण्यात आले. महिलांसाठी विशेष स्पर्धाही घेण्यात आल्या. याशिवाय मंगळागौरीचे खेळ म्हणजे तर मंडळाचा गाभा.
विविध प्रकारची फळे, फुले, पाने, भाज्या यांचा वापर करून तयार केलेले आगळेवेगळे दागिने लेवून मंडळातील भगिनींनी वसंत ऋतूचे उत्साहाने स्वागत केले.

या वर्षी रंगपंचमीचे रंग खेळताना मंडळाने कुणाचे गाण्याचे, कुणाचे नृत्याचे, तर कुणाचे सुगरणीचे गुण जोपासत आगळीवेगळी पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी केली. गेल्या अनेक वर्षांप्रमाणेच या वर्षीही भांडुपमधील भव्य स्वागत यात्रेची धुरा मंडळाने लीलया सांभाळली.

मंडळातर्फे सामाजिक कार्याचे भान ठेवून महिलांसाठी उन्हाळी शिबीर, मेहंदी, रांगोळी, सेल्फ मेकअप यांचे आयोजन केले जाते. तसेच उमंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महिला विशेष आरोग्य तपासणीचे आयोजन, वृक्षारोपण, तर कधी आदिवासी पाडय़ाला भेट असे योगदान मंडळ देते. या वर्षी पर्यावरण दिनानिमित्त मंडळाने ‘मैत्रीचं झाड’ या संकल्पनेतून ‘वृक्षवल्ली’ या संस्थेला काही रक्कम देऊन वृक्षांची लागवड केली.

मंडळ म्हटलं की, जागेचा प्रश्न असतोच. मात्र हनुमान मंदिर आणि उमंग ट्रस्ट आम्हाला नेहमीच सहकार्य करतात. मंडळाच्या अध्यक्षा श्वेता पिसाळ तर खजिनदार रचना डिचवलकर असून उत्साही आणि कार्यतत्पर अशा सदस्या सुनेत्रा, शोभा, पूजा, संगीता, दुर्गा, प्रणीता, उमा, स्मिता, साधना यांच्या सहकार्याने मनस्विनी महिला मंडळाची जोमाने वाटचाल सुरू झाली आहे, असे लीना यांनी आवर्जून सांगितले.