
>> सीए अभिजित कुळकर्णी – योगशिक्षक, भारतीय योग मंदिर
21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा होतो. आपली योग परंपरा अखिल विश्वाने आनंदाने, उत्साहाने आणि सहर्ष स्वीकारली आहे. योग दिनाचे महत्त्व समजून घेऊ या.
हिरण्यगर्भः योगस्य प्रोक्ता!
सर्वप्रथम मनुष्याला योगाभ्यासाचे ज्ञान देणाऱया हिरण्यगर्भ परमेश्वराला आपण वंदन करू.
मनुष्याला योगाभ्यासाचे ज्ञान ऋषीमुनींद्वारे मिळाले, पण या ऋषीमुनींना समाधी अवस्थेत असताना जे स्फुरण झाले, जी प्रेरणा झाली त्यातूनच योगाभ्यासाचा उगम झाला. हे स्फुरण किंवा प्रेरणा त्यांना परमेश्वरापासून मिळाली आणि म्हणून योगाभ्यासाचा उद्गाता असे हिरण्यगर्भाला अर्थात परमेश्वराला म्हटले जाते. योगाभ्यासावरती अनेक ऋषीमुनींनी आपली मते मांडली. अनेक ग्रंथ लिहिले. ‘योगवासिष्ठ’ हा वशिष्ठ ऋषींचा ग्रंथ आहे. याज्ञवल्क्य ऋषींनी योगाभ्यासावरती आपले विचार मांडलेले आहेत.
भगवद्गीता
तथापि योगाभ्यासावरची एक परिपूर्ण रचना निर्माण झाली ती महाभारत काळात. प्रत्यक्ष परमचेतन अशा श्रीकृष्णांनी मनुष्याचे प्रबोधन करण्यासाठी उपदेशिलेली आणि स्वयं महर्षी व्यासांनी ग्रथित केलेली, श्रीगणेशाने लिहिलेली भगवद्गीता होय.
भगवद्गीतेचा प्रत्येक अध्याय हा एक योग आहे. यात कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, ध्यानयोग आहे, बुद्धियोग आहे, सांख्य आहे, भक्ती आहे, स्वार्थ आहे आणि परमार्थही आहे. जीवन कसे समरसतेने जगावे याची प्रेरणा आहे, हौतात्म्याचे आकर्षण आहे.
योगसाधना
योगाभ्यासाची सुरुवात जरी तुम्ही आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून केली तर योगाभ्यास हा निरंतर केला पाहिजे. महर्षी पतंजलींचे एक सर्वव्यापी सूत्र आहे.
स तू दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूमिः
कोणताही अभ्यास अथवा साधना ही दीर्घकाळापर्यंत केली पाहिजे. त्याच्यामध्ये निरंतरता असावी लागते आणि ही साधना पूर्ण श्रद्धेने, अंतःकरणापासून आणि जिद्दीने केली पाहिजे तरच त्या साधनेमध्ये, त्या अभ्यासामध्ये आपल्याला सिद्धी किंवा यश प्राप्त होते.
या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी आपण संकल्प करू की, मी माझ्या शारीरिक स्वास्थ्यासाठी, मानसिक शांतीसाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी नित्यनेमाने योगाभ्यास करीन, ध्यानधारणा करीन.
महर्षी पतंजली आणि योगदर्शन
योगाभ्यासाचे ज्ञान हे अनेक ग्रंथांमध्ये शास्त्रामध्ये उपनिषदांमध्ये, वेदांमध्ये विखुरलेले होते. हे सर्व ज्ञान संकलित करून त्याला शास्त्राचे स्वरूप देण्याचे महान दीव्य कार्य महर्षी पतंजलींनी सिद्ध केले. महर्षी पतंजलींनी योगाभ्यासाद्वारे चित्तशुद्धी, व्याकरणाद्वारे भाषाशुद्धी आणि आयुर्वेदाद्वारे शरीरशुद्धी याबद्दल मार्गदर्शन केले आहे. महर्षी पतंजलींनी योगदर्शन संकलित करून योगाभ्यासाला एक व्यवस्थित स्वरूप दिले आणि यानंतर योगाभ्यासाबद्दल अनेक योग्यांनी ग्रंथ निर्मिती केली. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या योग्यांनी योगाभ्यासावरती संहितांची रचना केली. स्वात्मारामानी हठगयोगप्रदीपिका निर्मिला. घेरंड संहितेची रचना झाली. षट्कर्म-संहिता लिहिली गेली. आधुनिक काळामध्ये स्वामी विवेकानंद, योगानंद परमहंस, स्वामी कुबलयानंद, निंबाळकर गुरुजी आणि निकम गुरुजी यांनी हिंदुस्थानात योगाभ्यासाचा प्रचार आणि प्रसार केला. कैवल्यधाम, अंबिका योग कुटिर, योग विद्यानिकेतन, योगा इन्स्टिटय़ूटसारख्या योगाभ्यासाला वाहिलेल्या संस्था निर्माण झाल्या. अर्वाचीन काळामध्ये बाबा रामदेव यांनी योगाभ्यासाचा आणि आयुर्वेदाचा केवळ देशातच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रचार आणि प्रसार केला.
www.bymyoga.in































































