
मिंधे गटाच्या गद्दारीचा आज राज्यभरात जणू वर्धापन दिनच साजरा करण्यात आला. कुठे खोके पायाखाली चिरडून, कुठे खोके हातात घेऊन तर कुठे 50 खोक्यांना चपलांचा हार खालून संताप व्यक्त करण्यात आला. विविध ठिकाणी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी दमदाटी केली.
मुंबईत प्रतिबंधात्मक आदेश
गद्दार दिन पाळला जात असल्याने व सोशल मीडियावर मिंध्यांविरुद्ध अनेक बोचऱया पोस्ट पडू लागल्याने त्यांच्या इशाऱयावरून पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. मुंबई पोलिसांनी तर प्रतिबंधात्मक आदेश काढून शिवसेनेचे अनेक शाखाप्रमुख आणि माजी नगरसेवकांना नोटिसा बजावल्या. गद्दार दिन पाळल्यास कारवाईचा इशाराच या माध्यमातून देण्यात आला. कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशी कोणतीही कृती केली जाऊ नये, सोशल मीडियात वादग्रस्त पोस्ट टाकू नयेत. तसे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी आपल्या आदेशात दरडावले. त्याचवेळी मुंबईत शिवसेना भवन, विविध शाखा तसेच प्रमुख भागांत पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला. पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मात्र, त्याला न जुमानता गद्दारांविरुद्ध निदर्शने करण्यात आली.
गिरगावच्या शाखेत पोलीस घुसले
गिरगावमधील चिराबाजार शाखेत घुसून पोलिसांनी धरपकड केली. तिथे शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, विभागप्रमुख संतोष शिंदे तसेच काही शिवसैनिक होते. पोलिसांनी कोणतेही कारण न देता दुधवडकर आणि शिंदे यांना ताब्यात घेतले. ‘आम्ही आमच्या कार्यालयात बसलो आहोत. थेट आत तुम्ही कसे आलात? तुम्ही उद्या आमच्या घरातही असे घुसाल. ही दादागिरी आहे. आम्ही गुन्हा काय केला ते तर सांगा,’ असे बजावत संतोष शिंदे यांनी पोलिसांना जाब विचारला. मात्र, पोलिसांची दडपशाही सुरूच होती. शाखेबाहेरही पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. पोलिसांनी दडपशाहीने दुधवडकर आणि शिंदे यांना अटक केली व नंतर त्यांची सुटका करण्यात आली. शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन या कारवाईबद्दल पोलिसांना फैलावर घेतले. यावेळी माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळही होते.
घोषणांचे बुक्के…
– पन्नास खोके, एकदम ओके
– पन्नास खोके, माजलेत बोके
– खोके सरकार हाय हाय, गद्दारांना इथे थारा नाय
– महाराष्ट्रातून गद्दार, होणार हद्दपार
– गद्दारांचे करायचे काय, खाली डोके वर पाय
वरळीत जोरदार निदर्शने
शिवसेना वरळी विभागाच्या वतीने गद्दारांविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवसैनिक रस्त्यावर उतरले. पोलिसांनी यावेळी अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मुंबईत ठिकठिकाणी गद्दारांविरोधात आंदोलन करण्यात आले.
कोकणात शिवसैनिक आक्रमक
गद्दारांविरुद्ध कोकणात शिवसैनिकांचा संताप पाहायला मिळाला. कुडाळ शिवसेना शाखेसमोर रिकामे खोके रचत त्यावर 50 बिस्कीटचे पुढे ठेवण्यात आले व मिंध्यांचा धिक्कार करण्यात आला. कणकवलीत मध्यवर्ती कार्यालयाबाहेरही हातात खोके घेऊन शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत निषेध नोंदवला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कुडाळ येथे आंदोलन केले. 50 खोक्यांना चपलांचा हार घालून त्यांनी चीड व्यक्त केली.
पश्चिम महाराष्ट्रात तीव्र संताप
40 गद्दार आमदार आणि खासदारांविरोधात पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह विविध ठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निदर्शने करून निषेध करण्यात आला. ‘पचास खोके… खाऊन खाऊन माजलेत बोके’ अशा घोषणा देण्यात आल्या. कोल्हापुरातील शिवसैनिकांनी ऐतिहासिक बिंदू चौक येथे प्रतीकात्मक 50 खोके मांडून मिंधे सरकारविरोधात चपराकात्मक आंदोलन केले. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
सांगलीत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्या नेतृत्वाखाली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये निदर्शने करण्यात आली. शिवसेनेच्या वतीने सोलापूर शहरात रॅली काढण्यात आली. ‘50 खोके… एकदम ओक्के’ असे फलक गाडय़ांना लावण्यात आले होते.
हा पोलिसांचा गैरवापर – अरविंद सावंत
शिवसेना कार्यालयात कार्यकर्ते-पदाधिकारी बसले असताना पोलीस कसे घुसतात, जबरदस्ती त्यांना पकडून कसे काय नेले जाते, असे प्रश्न शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी देशाच्या गृहमंत्र्यांना केले. आंदोलन करताना अटक झाल्यास हरकत नाही, मात्र कार्यालयात बसले असताना अटक हा पोलीस यंत्रणा आणि कायद्याचा गैरवापर असून मी याचा निषेध करत असल्याचे सावंत म्हणाले. कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचे काम पोलीसच करत असून हे सगळे कोणाच्या इशाऱयावर केले जात आहे, असा सवालही त्यांनी केला.
राष्ट्रवादीची गद्दारांविरोधात निदर्शने
राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी गद्दारांचा निषेध करण्यात आला. मुंबईत राष्ट्रवादी भवनबाहेर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गद्दारांविरुद्ध जोरदार घोषणा देत निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख हे आंदोलनात सहभागी होण्याआधीच त्यांना पोलिसांनी रोखले व ताब्यात घेतले.
नाशिकमध्ये खोके चिरडले
नाशिक शहर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी गद्दारांविरोधात आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी पायाखाली खोके चिरडून खोके सरकार आणि गद्दारांचा धिक्कार केला. सटाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत निदर्शने केली. राष्ट्रवादीकडूनही जिह्यात विविध ठिकाणी विविध मार्गांनी गद्दारांचा निषेध करण्यात आला. देवळा येथे राष्ट्रवादीने निषेध मोर्चा काढला.





























































